प्ले ऑफमध्ये कोणते ४ संघ? गुजरातचे 'वर्चस्व', मुंबईची डोकेदुखी वाढली; जाणून घ्या टक्केवारी

IPL 2023 Playoffs chances : आयपीएल २०२३चा हंगाम आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे.

आयपीएल २०२३चा हंगाम आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. त्यामुळे प्ले ऑफच्या शर्यतीत चढाओढ पाहायला मिळते आहे. खरं तर आताच्या घडीला अशी परिस्थिती आहे की, सर्वच संघ प्ले ऑफमध्ये स्थान मिळवू शकतात.

१६ गुणांसह गतविजेता गुजरात टायटन्सचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे, तर १३ गुणांसह चेन्नई सुपर किंग्ज दुसऱ्या स्थानी स्थित आहे.

सर्व संघांना प्ले ऑफमध्ये धडक मारायची संधी असली तरी गुजरात आणि चेन्नईचे वर्चस्व असल्याचे दिसत आहे. टक्केवारीनुसार पाहिले तर, गुजरात टायटन्सचा संघ ९९.५ टक्के प्ले ऑफमध्ये प्रवेश करेल, तर चेन्नईचा संघ पात्र ठरण्याची शक्यता ८२ टक्के एवढी आहे.

काल गुजरात आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना पार पडला. लखनौचा पराभव झाला असला तरी त्यांचा संघ क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे लखनौचा संघ आयपीएल २०२३ च्या प्ले ऑफमध्ये जाण्याची शक्यता ४५ टक्के आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ देखील आताच्या घडीला टॉप-5 मध्ये आहे. त्यांची प्ले ऑफमध्ये पोहचण्याची शक्यता ४२ टक्के आहे. लक्षणीय बाब म्हणजे जवळपास सर्वच संघांना साखळी फेरीतील आणखी तीन ते चार सामने खेळायचे आहेत.

मुंबई इंडियन्सचा संघ १० गुणांसह सहाव्या स्थानावर स्थित आहे. मुंबईच्या संघाची प्ले ऑफमध्ये धडक मारण्याची शक्यता ४१ टक्के आहे. राजस्थान रॉयल्सचा संघ १० गुणांसह चौथ्या स्थानावर असला तरी प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवण्याची त्यांची शक्यता केवळ २५ टक्के आहे.

शिखर धवनच्या नेतृत्वातील पंजाब किंग्जचे देखील १० गुण असून ते सातव्या स्थानावर आहे. पंजाबच्या संघाची प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्याची शक्यता ३९ टक्के आहे.

प्ले ऑफच्या शर्यतीत तळाशी असलेल्या संघांमध्ये दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबादचा संघ आहे. कोलकाता, हैदराबाद आणि दिल्लीचा संघ ८ गुणांसह अनुक्रमे आठव्या, नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहे.

केकेआरच्या संघाची प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवण्याची शक्यता १४ टक्के आहे, तर सनरायझर्स हैदराबादचा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरण्याची शक्यता फक्त १२ टक्के आहे.

यंदाच्या हंगामात सुरूवातीचे पाच सामने गमावल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने शानदार पुनरागमन केले आहे. त्यांनी १० पैकी ४ सामने जिंकले आहेत. त्यामुळे प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आगामी सामने त्यांच्यासाठी 'करा किंवा मरा' असे असतील. दिल्लीच्या संघाची प्ले ऑफमध्ये खेळण्याची शक्यता ही केवळ ११ टक्के आहे.