Jhulan Goswami Farewell Match: झुलन गोस्वामीच्या फेअरवेल सामन्यामध्ये कर्णधार हरमनप्रीत कौर भावूक, पाहा निरोपाचा क्षण

भारतीय महिला क्रिकेट संघातील दिग्गज झुलन गोस्वामीने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. लॉर्ड्सच्या धरतीवर तिने आपल्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला.

भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये क्रिकेटच्या पंढरीत तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडली. भारताच्या महिलांनी शानदार खेळी करून तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडला व्हाईटवॉश दिला आहे. पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवत मालिका खिशात घातल्यानंतर शनिवारी लॉर्ड्सवर झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडवर १६ धावांनी थरारक विजय मिळवला.

सलग मिळवलेल्या विजयासह भारताने मालिकेत ३-० असे निर्विवाद वर्चस्व राखत झुलन गोस्वामीला यादगार निरोप दिला. मिताली राजसोबत भारतीय क्रिकेटला मोठ्या उंचीवर नेणाऱ्या झुलन गोस्वामीने निवृत्ती घेतली आहे. तिने आपल्या कारकिर्दीतील शेवटचा सामना लॉर्ड्सच्या धरतीवर खेळला.

तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले. मात्र भारताची सुरुवात चांगली झाली नाही. शेफाली वर्मा (०), यास्तिका भाटिया (०), हरमनप्रीत कौर (४) आणि हरलीन देओल (३) या झटपट बाद झाल्याने भारताची अवस्था ४ बाद २९ अशी झाली. त्यानंतर स्मृती मानधना (५०) आणि दीप्ती शर्मा (नाबाद ६८) यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर भारताने १६९ धावांपर्यंत मजल मारली. इंग्लिश संघाकडून केथ क्रॉस हिने ४ बळी पटकावले.

भारतीय संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लिश फलंदाजांना घाम फुटला. भारताच्या आक्रमक गोलंदाजीच्या माऱ्यासमोर कोणताच फलंदाज खेळपट्टीवर जास्त काळ टिकला नाही. रेणुका सिंग हिने भेदक गोलंदाची करत इंग्लंडच्या फलंदाजीला सुरुंग लावला. त्यामुळे इंग्लंडची अवस्था ७ बाद ६५ अशी झाली होती. त्यानंतर चार्लिन डीन हिने एक बाजू लावून धरत तळाच्या फलंदाजांसह इंग्लंडला सामन्यात कमबॅक करून दिले. इंग्लंडचा संघ चमत्कार घडवणार असे दिसत असतानाच ४४ व्या षटकात दीप्ती शर्माने डीन हिला मांकडिंग पद्धतीने धावबाद करत संघाला १६ धावांनी विजय मिळवून दिला.

भारताकडून रेणुका सिंगने ४ तर झुलन गोस्वामी आणि राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी २-२ बळी पटकावले. भारतीय महिलांनी या विजयासह दिग्गज झुलन गोस्वामीला विजयी भेट दिली. झुलनच्या फेअरवेल सामन्यानंतर भारतीय खेळाडू भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. कर्णधार हरमनप्रीत कौर देखील भावूक झाली आणि तिला मैदानावरच रडू कोसळलं.

झुलन गोस्वामी भारतीय महिला गोलंदाजीचा प्रमुख चेहरा होती. इंग्लंडविरूद्धच्या ३-० या विजयासह भारताने इंग्लडच्या धरतीवर इतिहास रचला आहे. लक्षणीय बाब म्हणजे भारताने तब्बल 23 वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर इंग्लंडच्या धरतीवर एकदिवसीय मालिका जिंकली आहे. भारताने शेवटच्या वेळी १९९९ मध्ये इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका जिंकली होती.

झुलन गोस्वामीने २० वर्षाच्या आपल्या क्रिकेट कारकिर्दीत १२ कसोटी (४४ बळी), २०२ एकदिवसीय सामने (२५३ बळी) आणि ६८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण ५६ बळी पटकावले आहेत. झुलन गोस्वामीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३५० हून अधिक बळी पटकावले आहेत.

३९ वर्षीय झुलनने ६वेळा एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. झुलनच्या अखेरच्या सामन्यानंतर तिच्यावर अनेक क्षेत्रातील दिग्गज शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. तर बीसीसीआय अध्यक्ष यांनी तिचे कौतुक करताना म्हटले होते की, "जर माझ्या मुलीला भविष्यात क्रिकेट खेळायचे असेल तर मी तिला झुलन गोस्वामी हो असा सल्ला देईन."