जसप्रीत बुमराहच्या ६ विकेट्स! कपिल देव, श्रीनाथशी बरोबरी; तर इम्रान खानवर पडला भारी

IND vs SA 2nd Test : भारतीय गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करून दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव १७६ धावांवर गुंडाळला. भारतासमोर दुसरी कसोटी जिंकण्यासाठी ७९ धावांचे माफक लक्ष्य आहे. या डावात जसप्रीत बुमराहने ६ विकेट्स घेत अनेक विक्रम मोडले.

दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करमने १०३ चेंडूंत १७ चौकार व २ षटकारांनी १०६ धावा केल्या. बुमराहने शेवटची विकेट घेत आफ्रिकेचा दुसरा डाव १७६ धावांवर गुंडाळला. भारतासमोर विजयासाठी ७९ धावांचे आव्हान आहे आणि बुमराहने ६१ धावा देत ६ विकेट्स घेतल्या.

केप टाऊनमध्ये पाहुण्या गोलंदाजांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंमध्ये जसप्रीतने आज शेन वॉर्न ( १९९४ ते २००६) याच्या १७ विकेट्सची बरोबरी केली. इंग्लंडचे कॉलिन बॅलीथे ( १९०६ ते १९१०) हे २५ विकेट्ससह या विक्रमात आघाडीवर आहेत.

दक्षिण आफ्रिकेत कसोटीत डावात ३ वेळा पाच विकेट्स घेण्याच्या जवागल श्रीनाथ यांच्या विक्रमाशीही जसप्रीतने बरोबरी केली. आशिया खंडाबाहेर ८ वेळा डावात ५ विकेट्स घेण्याच्या इशांत शर्माच्या ( ५० सामने) विक्रमाशी जसप्रीतने ( २८ सामने) बरोबरी केली. या विक्रमात कपिल देव हे ( ९) अव्वल स्थानावर आहेत आणि त्यांनी ४५ कसोटींत हा पराक्रम केला आहे.

SENA देशांत कसोटी क्रिकेटमध्ये ६ वेळा डावात ५ विकेट्स घेण्याच्य बी चंद्रशेखर ( ३२ डाव) व झहीर खान ( ५३ डाव) यांच्याशी जसप्रीतने आज बरोबरी केली. कपिल देव ( ६२ डाव) यांनी ७ वेळा हा पराक्रम केला आहे.

SENA देशांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या आशियाई गोलंदाजांत जसप्रीत बुमराहने पाकिस्तानच्या इम्रान खानला ( १०९) आज मागे टाकले. वसीम अक्रम ( १४६), अनील कुंबळे ( १४१), इशांत शर्मा ( १३०), मोहम्मद शमी ( १२३), मुथय्या मुरलीधरन ( १२०), झहीर खान ( ११९), कपिल देव ( ११७), वकार युनिस ( ११३) यांच्यानंतर जसप्रीतचा ( ११३) क्रमांक येतो.