Ranji Trophy Winners J&K Celebration : एकच जल्लोष! खेळाडूंनी BCCI अध्यक्षांसोबत असा साजरा केला आनंद

पहिल्यांदा रणजी ट्रॉफीवर नाव कोरल्यावर जम्मू काश्मीरच्या खेळाडूंनी असा व्यक्त केला आनंद, इथं पाहा खास फोटो

पहिल्यांदा फायनल खेळताना पहिली वहिली रणजी ट्रॉफी जिंकल्यावर जम्मू काश्मीरच्या खेळाडूंनी कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या हुबळीच्या मैदानात एकच जल्लोष केला.

​जम्मू काश्मीरच्या संघाने जिद्द अन् चिकाटीच्या जोरावर रणजी करंडक स्पर्धेचे ऐतिहासिक जेतेपद पटकावलं. कडक फलंदाजी आणि गोलंदाजीतील भेदक माऱ्याच्या जोरावर कर्नाटक विरुद्धचा सामना अनिर्णित राखत जम्मू काश्मीरनं ६७ वर्षांनी जेतेपदाला गवसणी घातली.

दिमाखदार कामगिरीनंतर खेळाडूंचा उत्साह अगदी गगनाला भिडलेला होता. डगआउटमधून मैदानात धावत येत खेळाडूंनी आपल्या सहकाऱ्यांच्या साथीनं या विजयाचा अगदी खास अंदाजात आनंद साजरा केला.

खेळाडूंसह सपोर्ट स्टाफमधील सदस्यही मैदानात भांगडा करताना दिसले. कष्टाचं चीज झाल्याचा हा प्रत्येक खेळाडू आणि या संघाशी जोडलेल्या प्रत्येकासाठी अविस्मरणीय क्षण ठरला.

ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार पारस डोगरा हा निशब्द झाला. पण हा क्षण किती मोठा आणि अभिमास्पद आहे ते या फोटोतून दिसून येते.

जम्मू काश्मीरच्या खेळाडूंनी ऐतिहासिक विजय साजरा करताना बीसीसीआयचे अध्यक्ष मिथून मिन्हास यांना खांद्यावर घेतल्याचेही पाहायला मिळाले. मिन्हास हे जम्मू काश्मीरचे आहेत. जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या प्रशासकाच्या रुपातही त्यांनी काम केले आहे. जम्मू काश्मीर क्रिकेटमध्ये त्यांनी खास योगदान दिले आहे. त्यामुळे हे सेलिब्रेशन पाहायला मिळाले.

जम्मू काश्मीरच्या क्रिकेटसाठी हा एक खास आणि अविस्मरणीय क्षण आहे. संघातील अनेक खेळाडूंसाठी आता टीम इंडियाचे दरवाजेही खुले होतील.

जम्मू काश्मीरच्या ऐतिहासिक विजयाच्या सेलिब्रेशमध्ये सहभागी झाल्यावर मिथून मिन्हास यांनी बीसीसीआय सचिव देवजित सैकिया यांच्यासह पारस डोगरा याला ट्रॉफी देताना पाहायला मिळाले.

रणजी फायनलमध्ये पहिल्या डावातील शतकी खेळी करणारा शुभम पुंडीर हा सामनावीर ठरला. त्याने १२१ धावांची दमदार खेळी केली होती.

गोलंदाजीत कर्नाटकचा अर्धा संघ तंबूत धाडणाऱ्या औकिब नबी हा मालिकावीर ठरला. यंदाच्या हंगामात त्याने ६० विकेट्स घेत इतिहास रचला आहे. लवकरच हा गोलंदाज भारतीय कसोटी संघात दिसू शकतो.