शाहिद आफ्रिदीची भारतावर पुन्हा बोचरी टीका; न्यूझीलंड, इंग्लंडच्या खांद्यावर बंदूक ठेवून वादग्रस्त विधान

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांनी पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली आहे. न्यूझीलंडनं तर वन डे सामना सुरू व्हायच्या काही तास आधीच दौरा रद्द केला अन् मायदेशात परतण्याचा हट्ट धरला.

पाकिस्तान क्रिकेटसाठी मागील काही दिवस चांगले गेलेले नाहीत. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांनी पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली आहे. न्यूझीलंडनं तर वन डे सामना सुरू व्हायच्या काही तास आधीच दौरा रद्द केला अन् मायदेशात परतण्याचा हट्ट धरला. दहशतवादी हल्ला होणार असल्याची शक्यता त्यांच्या गुप्तचर विभागानं व्यक्त केली होती आणि त्यामुळे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं दौरा रद्द केला. त्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डानंही ( ECB) खेळाडू पाकिस्तान दौऱ्यावर येण्यास इच्छूक नसल्याचे सांगत दौरा रद्द केला.

NZC व ECBच्या या निर्णयानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड, आजी-माजी खेळाडू चांगलेच खवळले आणि त्यांनी दोन्ही देशांवर टीका केली. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी व माजी गोलंदाज शोएब अख्तर हेही मागे राहिले नाहीत. माजी अष्टपैलू खेळाडू आफ्रिदीनं पुन्हा एकदा या विषयावर त्याचे मत मांडताना भारताप्रती गरळ ओकली आहे. NZC चा निर्णय कधीच विसरता येणार नाही, असे मत त्यानं व्यक्त केले.

तो म्हणाला,''हा दौरा आयोजित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा कामाला लागली होती आणि न्यूझीलंड क्रिकेट मंडळानंही त्यावर समाधान व्यक्त केलं होतं. त्यानंतर ते पाकिस्तानात दाखलही झाले होते. न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंनाही पाकिस्तानात खेळायला आवडते आणि त्यांच्यासाठी हा असा दौरा रद्द होणे विसरण्यासारखे नाही. जर खरंच दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता होती, तर त्याची माहिती त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डालाही द्यायला हवी होती. त्यानंतर पाकिस्तान गुप्तचर विभागाकडून येणाऱ्या माहितीची वाट पाहायला हवी होती.''

पाकिस्तानचे केंद्रीय सूचना मंत्री फवाद चौधरी यांनी न्यूझीलंड संघाला आलेला धमकिचा ई-मेल हा भारतातून आल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यावर आफ्रिदीनं मत व्यक्त करताना वादग्रस्त विधान केलं. सुशिक्षित राष्ट्रांनी भारताचे अनुकरण करायला नको आणि त्यांनी त्यांच्या डोक्याचा वापर करून निर्णय घ्यायला हवा, असे तो म्हणाला.

''एक देश आमच्या मागे हात धुवून लागला आहे, परंतु अन्य देशांनी तिच चूक करावी असे मला वाटत नाही. तुम्ही सर्व सुशिक्षित राष्ट्र आहात आणि भारताचं अनुकरण करायला नको. क्रिकेट हा नातं घट्ट करतो. भारतातील अवस्था बिकट आहे. आम्हाला धमकावले जात आहे,''असे तो म्हणाला.