नाद खुळा! ३४ चेंडूंत १५६ धावांचा पाऊस; इशान किशन बनला जगातील युवा द्विशतकवीर, मोडले अनेक विक्रम

India vs Bangladesh, 3rd ODI Live Updates: मिळालेल्या संधीचं सोनं कसं करायचं हे इशान किशनने ( Ishan Kishan) आज दाखवून दिले.

मिळालेल्या संधीचं सोनं कसं करायचं हे इशान किशनने ( Ishan Kishan) आज दाखवून दिले. कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला अन् इशानची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड झाली. संघातील स्थान पक्के करण्याची हिच ती वेळ... असे मनाशी ठाम करून इशानने बांगलादेशच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली.

बांगलादेशमध्ये वन डेत सलामीवीर म्हणून ५०+ धावा करणारा इशान हा दुसरा युवा भारतीय फलंदाज ठरला. गौतम गंभीरने २१ वर्ष व १८४ दिवसांचा असताना हा पराक्रम केला होता. इशान आता २४ वर्ष व १४५ दिवसांचा आहे आणि त्याने वीरेंद्र सेहवागचा ( २४ वर्ष व १७३ दिवस) विक्रम मोडला.

बांगलादेशमध्ये वन डे त १०००+ धावा करणारा विराट कोहली पहिला भारतीय ठरला. पाहुण्या फलंदाजांत कुमार संगकारा १०४५ धावांसह आघाडीवर आहे. बांगलादेशविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांतही विराटने अव्वल स्थान पटकावले. त्याने १३२०* धावा करताना सचिन तेंडुलकर ( १३१६), रोहित शर्मा ( १२२५) व गौतम गंभीर ( १०२३) यांचा विक्रम मोडला.

इशानने ८५ चेंडूंत वन डे तील पहिले शतक झळकावले. २००३ साली युवराज सिंगने बांगलादेशविरुद्ध पदार्पणाच्या डावात शतक झळकावले होते आणि त्यानंतर इशान हा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. इशान किशनने १०३ चेंडूंत आज हा टप्पा ओलांडताना वीरेंद्र सेहवागचा २०११ साली ( ११२ चेंडू वि. वेस्ट इंडिज) नोंदवलेला विक्रम मोडला. रोहितने ११७ चेंडूंत ( वि. वेस्ट इंडिज, २०१८) व सचिन तेंडुलकर ११८ चेंडू ( वि. दक्षिण आफ्रिका, २०१०) चा सामना करताना हा विक्रम केला होता.

वन डे क्रिकेटमध्ये पहिल्या ३० षटकांत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये इशानने १७९* धावांसह दुसरे स्थान पटकावले. या विक्रमात ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज शेन वॉटसन ( १८५* वि. बांगलादेश, २०११) अव्वल स्थानी आहे. क्विंटन डी कॉकने २०१६मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १६६ धावा केल्या होत्या आणि त्याआधी हर्षल गिब्सने २००६मध्ये ऑसींविरुद्ध १५६ धावा चोपल्या होत्या.

बांगलादेशमध्ये वन डे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रम इशानने नावावर करताना ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसनचा ( १८५*) २०११ सालचा विक्रम मोडला. विराटने २०१२ मध्ये पाकिस्तानविरुद्ध १८३ आणि लिटन दासने २०२०मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध १७६ धावा केल्या होत्या.

प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर वन डे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम धावांच्या भागीदारीचा विक्रम आज विराट व इशान या भारतीय जोडीने केला. यापूर्वी १९९८मध्ये सौरव गांगुली व सचिन तेंडुलकर यांनी श्रीलंकेविरुद्ध २५२ धावांची भागीदारी केली होती. विराट व इशान यांनी १९० चेंडूंत २९० धावांची भागीदारी केली.

इशान हा वन डे त द्विशतक झळकावणारा युवा फलंदाज ठरला. त्याने २४ व र्ष व १४५ दिवसांचा असताना हा पराक्रम करताना रोहितचा ( २६ वर्ष व १८६ दिवस) विक्रम मोडला. इशान १३१ चेंडूंत २४ चौकार व १० षटकारांसह २१० धावांवर बाद झाला.

वन डे क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक ठरले. इशानने १२६ चेंडूंत द्विशतक पूर्ण करताना ख्रिस गेलचा १३८ चेंडू ( वि. झिम्बाब्वे, २०१५) चा विक्रम मोडला. तो भारताकडून द्विशतक झळकावणारा चौथा फलंदाज ठरला. यापूर्वी सचिन तेंडुलकर ( २०१०), वीरेंद्र सेहवाग ( २०११), रोहित शर्मा ( २०१३, २०१४ व २०१७) यांनी हा पराक्रम केला आहे.