IPL 2026: ज्याच्यासाठी मोजले १८ कोटी, तोच होणार स्पर्धेबाहेर? फिटनेस अपडेटने वाढवलं टेन्शन

IPL 2026 Injury Update: २८ मार्चपासून IPL स्पर्धेच्या नव्या हंगामाला होणार सुरुवात

इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेच्या यंदाच्या हंगामातील वेळापत्रक समोर आले आहे. २८ मार्चपासून लोकप्रिय टी२० लीग स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. गत चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील लढतीने नव्या हंगामाला सुरुवात होईल. बंगळुरूच्या स्टेडियमवर सलामीचा सामना खेळवण्यात येणार आहे.

नवीन हंगाम २८ मार्चपासून सुरू होत आहे. सर्वांचे लक्ष आता आयपीएलच्या ट्रॉफीवर असणार आहे. यासाठी दोन महिने संघर्ष सुरू राहील. स्पर्धेसाठी संघ आधीच तयारी करत असताना, काही संघांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, ज्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा फटका बसल्याचे चित्र समोर आले आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघाचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला भारत-बांगलादेश राजकीय वादामुळे IPL मधून बाहेर करण्यात आले. तशातच आता, श्रीलंकेचा स्टार वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानाच्या तंदुरुस्तीबाबतही त्यांना आणखी आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

महान गोलंदाज लसिथ मलिंगा याच्यासारखी स्टाईल असलेला उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज पाथिरानाला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी२० विश्वचषक सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. ज्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला होता. त्यानंतर तो अद्यापही पूर्णपणे बरा झालेला दिसत नाही.

१८ फेब्रुवारी रोजी त्याला डाव्या पायाला दुखापत झाली होती, त्याच्या स्नायूंमध्ये ताण आला होता. यामुळे, त्याला किमान चार आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. आता त्याचे पुनरागमन कधी होणार याची कल्पना नाही, कारण दुखापतीतून बरे होण्यासाठी आणि मॅच-फिट होण्यासाठी वेळ लागू शकतो.

चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएल कारकिर्दीची सुरुवात करणारा तरुण वेगवान गोलंदाज पाथिरानाला गेल्या लिलावापूर्वी त्याच्या मूळ फ्रँचायझीने रिलीज केले. त्यानंतर कोलकाता नाइट रायडर्स संघाने तब्बल १८ कोटींची बोली लावून संघात घेतले आहे. पण तो जर स्पर्धेसाठी तंदुरुस्त नसेल तर हा केकेआरसाठी धक्का मानला जाईल.