T20 वर्ल्ड कपच्या प्रश्नावर विराट कोहलीचं थेट उत्तर, म्हणाला "मला पूर्ण कल्पना आहे की..."

Virat Kohli, T20 World Cup 2024: विराटला टीम इंडियाच्या T20 संघात घेतले जाणार नाही, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरु आहे

Virat Kohli on T20 World Cup Selection, IPL 2024 RCB vs PBKS: मराठमोळ्या ऋतुराजच्या CSK संघाविरोधात RCBने सलामीचा सामना गमावला. पण त्यानंतर दुसऱ्या सामन्यात 'रनमशिन' विराट कोहलीच्या ७७ धावांच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पंजाब किंग्जवर ४ चेंडू आणि ४ गडी राखून विजय मिळवला.

बराच काळ क्रिकेटपासून दूर असलेला सलामीवीर शिखर धवन याने केलेल्या ४५ धावा आणि जितेश शर्माच्या २७ धावांच्या खेळीमुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्ज संघाने २० षटकांत ६ बाद १७६ धावा केल्या.

आव्हानाचा पाठलाग करताना विराटने केलेल्या ४९ चेंडूतील ७७ धावांच्या तडाखेबाज खेळीने RCBला विजय मिळवून दिला. या विजयानंतर मनोगत व्यक्त करताना विराटने T20 World Cup 2024 बाबत मोठे वक्तव्य केले.

सामन्यात समालोचन करताना, केविन पीटरसन म्हणाला होता, "यंदाचा टी२० वर्ल्ड कप अमेरिकेत होतोय. भारत-पाकिस्तान सामना न्यूयॉर्कला होणार आहे. अशा वेळी विराट कोहलीसारखा खेळाडू मैदानात खेळणे क्रिकेटच्या वृद्धीसाठी उपयुक्त ठरेल असे वाटते."

यावर रवी शास्त्री यांनी उत्तर दिले, "क्रिकेटच्या वृद्धीसाठी नव्हे तर स्पर्धा जिंकण्यासाठी भारताला संघ खेळेल. २००७ ला भारत नव्या दमाच्या खेळाडूंना सोबत घेऊन जिंकला होता कारण तेव्हा कोणतेही दडपण नव्हते. यावेळीही तसेच केले पाहिजे."

तशातच काही दिवसांपूर्वी चर्चा रंगली होती की विराट कोहलीला टी२० वर्ल्ड कपच्या संघात घेतले जाणार नाही. तर रोहितने मात्र विराटच्या समावेशाचा आग्रह धरला होता. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर विराटने एक सूचक विधान केले.

शास्त्री-पीटरसन वादानंतर, विराटने यावर उत्तर दिले. तो म्हणाला, "जगाच्या कानाकोपऱ्यात टी२० क्रिकेटचा प्रसार करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. काही लोकांच्या मते मी 'टी२० क्रिकेट'चा चेहरा आहे आणि मी अजूनही ती जबाबदारी पार पाडू शकतो असं मला वाटतं."