IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...

The IPL 2024 Playoffs scenario - इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील प्ले ऑफच्या दोन जागा निश्चित झाल्या आहेत आणि उर्वरित दोन जागांसाठी ५ संघ शर्यतीत आहेत.

कोलकाता नाईट रायडर्सने १९ गुणांसह क्वालिफायर १ मधील आपली जागा पक्की केली आहे आणि त्यांचा १ सामना शिल्लक आहे. तेच काल दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सवर मात करून राजस्थान रॉयल्सचे ( १६ गुण) प्ले ऑफमधील स्थान पक्के केले. आता उर्वरित २ सामन्यांत विजय मिळवून त्यांना क्वालिफायर १ साठी KKR समोर दावा ठोकायचा आहे.

स्टार स्पोर्ट्सने दिलेल्या आकडेवारीनुसार उर्वरित दोन जागांसाठी सनरायझर्स हैदराबाद व चेन्नई सुपर किंग्स यांची दावेदारी वजनदार आहे. SRH चे ८७.३%, तर CSK चे ७२.७% प्ले ऑफ खेळण्याचे चान्स आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची प्ले ऑफ खेळण्याची टक्केवारी ३९.३ इतकी, तर दिल्ली कॅपिटल्स व लखनौ सुपर जायंट्स यांची अनुक्रमे ०.७ व ०.२ टक्के इतकी आहे.

दिल्लीने बाजी मारून १४ गुणांसह साखळी सामन्याचा शेवट केला, परंतु त्याचवेळी त्यांनी स्वतःलाही प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राखले आहे. पण, त्यासााठी त्यांना गुजरात टायटन्स व पंजाब किंग्स यांनी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करून २०० हून अधिक धावा करायला हव्यात, शिवाय हे GT व PBKS यांनी हा सामना प्रत्येकी १०० हून अधिक धावांनी जिंकणे महत्त्वाचे आहे. तर दिल्लीचे प्ले ऑफमध्ये खेळणे पक्के होईल.

चेन्नई सुपर किंग्स १३ सामन्यांत १४ गुण व ०.५२८ अशा सरस नेट रन रेटसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत आणि शेवटच्या साखळी सामन्यात त्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना करायचा आहे. चेन्नईने हा सामना जिंकल्यास ते १६ गुणांसह प्ले ऑफची जागा पक्की करतील. पण, जर हरले, तरीही नेट रन रेट त्यांना वाचवू शकतो. अशा परिस्थिती RCB ने मोठ्या फकराने विजय मिळवल्यास CSK ला फटका बसू शकतो. पण, सनरायझर्स हैदराबादने उर्वरित दोन्ही सामने गमावल्यास CSK चा मार्ग मोकळा होईल.

सनरायझर्स हैदराबाद १२ सामन्यांत १४ गुण व ०.४०६ अशा नेट रन रेटसह चौथ्या क्रमांकावर आहेत. उर्वरित दोन सामन्यांत त्यांना गुजरात टायटन्स व पंजाब किंग्सचा सामना करायचा आहे. यापैकी एक विजय त्यांचा प्ले ऑफचा प्रवेश पक्का करेल. जर त्यांनी दोन्ही सामने गमावले, तर त्यांचा नेट रन रेटही आपटेल आणि मग सर्व गणित नेट रन रेटवर अलवंबून असेल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू १३ सामन्यांत १२ गुण व ०.३८७ अशा नेट रन रेटसह शर्यतीत आहे आणि शेवटच्या साखळी सामन्यात त्यांना चेन्नई सुपर किंग्सचा सामना करायचा आहे. हा सामना त्यांना मोठ्या फरकाने जिंकणे गरजेचा आहे. तर सरस नेट रन रेटच्या जोरावर ते प्ले ऑफमध्ये जाऊ शकतील.