IPLमध्ये 'अनसोल्ड' पण निघाला गोल्ड! ७ सिक्सर ठोकत १० कोटींच्या गोलंदाजाला धू धू धुतलं...

गुजरात टायटन्स ने १० कोटींना विकत घेतलेल्या गोलंदाजांवर केला हल्लाबोल

IPL 2024 Auction नुकतेच पार पडले. या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या दोन अनुभवी खेळाडूंना तगडी किंमत मिळाली. काही खेळाडू 'अनसोल्ड'देखील राहिले. पण अशाच एका अनसोल्ड राहिलेल्या फलंदाजाने बिग बॅश लीगमध्ये कहर केला.

ऑस्ट्रेलियाच्या एका युवा फलंदाजाने गुरूवारी गोलंदाजांची तुफान धुलाई केली. त्याने ब्रिस्बेन हीट संघाविरुद्ध तुफान फलंदाजी करत केवळ 23 चेंडूत 55 धावा कुटल्या.

भल्याभल्या ऑस्ट्रेलिया गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरलेल्या या फलंदाजाने 239.13च्या स्ट्राइक रेटने चेंडू सीमारेषेपार पोहोचवले. आपल्या खेळीत त्याने तब्बल 7 षटकार खेचले.

या युवा ऑस्ट्रेलियन फलंदाजाचे नाव जेक फ्रेझर मॅकगर्क ( jake fraser mcgurk ) . IPL 2024 मध्ये त्याला एकही खरेदीदार मिळाला नाही. पण आश्चर्याची बाब म्हणजे, त्याने धुलाई केलेल्या गोलंदाजांमध्ये IPL लिलावात तब्बल १० कोटींना विकल्या गेलेल्या गोलंदाजाचाही समावेश होता.

IPL 2024 च्या लिलावात १० कोटी रुपये मिळालेला स्पेन्सर जॉन्सनला मॅकगर्कने चांगलाच चोप दिला. गुजरात टायटन्सने १० कोटींना विकत घेतलेल्या जॉन्सनने ४ षटकात ३९ धावा दिल्या अन् १ बळी टिपला.