'यशस्वी' भव! मुंबईकरांना 'पाणीपूरी' खायला घालणाऱ्याने आज Mumbai Indiansला पाणी पाजले

IPL 2023, Yashasvi Jaiswal stuggle story Marathi : इंडियन प्रीमिअर लीगचा १००० वा सामना यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal) संस्मरणीय बनवला. मुंबईकर यशस्वीने मुंबई इंडियन्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर पाणी पाजले. यशस्वीचा इथवरचा प्रवास हा खूपच प्रेरणादायी आहे.

यशस्वीने जॉस बटलरसह ( १८) पहिल्या विकेटसाठी ७.१ षटकांत ७२ धावा जोडल्या. एकामागून एक फलंदाज माघारी जात असताना यशस्वी शड्डू ठोकून उभा राहिला. देवदत्त पडिक्कल ( २), जेसन होल्डर ( ११), शिमरोन हेटमायर ( ८) व ध्रुव जुरेल ( २) हेही आज मोठी खेळी करू शकले नाही. यशस्वी ६२ चेंडूंत १२४ धावांवर बाद झाला.

अनकॅप्ड फलंदाजांमधील ही सर्वोत्तम खेळी ठरला. त्याच्या या खेळीत १६ चौकार व ८ षटकारांचा समावेश होता. राजस्थानने ७ बाद २१२ धावा केल्या. आयपीएलमध्ये शतक झळकावणारा तो पाचवा अनकॅप्ड फलंदाज ठरला. यापूर्वी मनीष पांडे, पॉल व्हॅल्थॅटी, देवदत्त पडिक्कल व रजत पाटीदार यांनी ही किमया केली.

आयपीएलमध्ये शतक झळकावणारा यशस्वी हा चौथा युवा फलंदाज ठरला. त्याने २१ वर्ष व १२५ दिवसांचा असताना आज ही कामगिरी केली. मनीष पांडे ( १९ वर्ष व २५३ दिवस), रिषभ पंत ( २० वर्ष व २१८ दिवस) आणि देवदत्त पडिक्कल ( २० वर्ष व २८९ दिवस) हे युवा शतकवीर आहेत.

IPL 2020साठी झालेल्या लिलावात युवा खेळाडूंमध्ये सर्वांचे लक्ष वेधलेल्या मुळचा उत्तर प्रदेशच्या, परंतु मुंबई कर्मभूमी असलेल्या यशस्वी जैस्वालने. RRकडून IPLचे पहिले काँट्रॅक्ट मिळाले. युवा खेळाडूंत यशस्वीनं सर्वाधिक भाव खाल्ला होता. यशस्वीला राजस्थान रॉयल्सनं २.४० कोटींत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले.

यशस्वीच्या या यशामागे त्याची कठोर मेहनत, जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्ती आहे. तीन वर्ष यशस्वी तंबूत राहिला, पाणीपुरी विकली... क्रिकेटपटू बनण्यासाठी त्यानं जे हाल सोसले, ते डोळ्यात पाणी आणणारे आहेत. पण, त्याचा प्रवास हा अनेकांना प्रेरणा देणारा आहे.

मुंबईच्या आझाद मैदान येथील मुस्लीम युनायटेड क्लबच्या तंबूत ग्राऊंड्समनसोबत यशस्वी तीन वर्ष राहिला. एका डेअरी शॉपमध्ये तो काम करायचा, परंतु क्रिकेट खेळून पार थकून जायचा. त्यामुळे काम करताना त्याला झोप यायची. त्यामुळे त्याला मालकानं कामावरून काढून टाकलं होतं.फक्त एक यशस्वी क्रिकेटपटू बनायचंय हे एकच ध्येय उराशी बाळगून तो झटत राहिला.

उत्तर प्रदेशातील भदोही गावातील हा युवा खेळाडू. त्याच्या वडिलांचं गावाकडं एक लहानस दुकान आहे. क्रिकेटपटू बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यानं मुंबई गाठली.मुंबईत तो त्याच्या काकांकडे रहायचा, पण घर छोटं असल्यानं सर्वांना तेथे राहणे अवघड जायचे. त्याच्या काकांनी मुस्लीम युनायटेड क्लबच्या मालकांकडे यशस्वीला क्लबमध्ये रहायला देण्याची विनंती केली.

त्यानंतर यशस्वी क्लबच्या तंबूत तीन वर्ष राहिला. त्यानं हे त्याच्या घरच्यांना कधीच कळू दिले नाही. त्यांना कळले असते तर यशस्वीची क्रिकेट कारकिर्द तेथेच संपुष्टात आली असती. त्याचे वडील मुंबईला पैसे पाठवायचे, परंतु ते पुरेसे नव्हते. म्हणून यशस्वी आझाद मैदान येथील राम लीला येथे पाणीपूरी व फळ विक्री करायचा. अनेकदा तर त्याला रिकामी पोटी झोपावं लागलं आहे.