गौतम गंभीर कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक, पत्नी बिझनेसवुमन; सरकार महिना देते १ लाख पगार

भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि लखनौ सुपर जायंट्स ( LSG ) मेंटॉर गौमत गंभीर सध्या चर्चेत आहे तो विराट कोहलीसोबतच्या भांडणामुळे... २०१८मध्ये निवृत्ती घेतल्यानंतर गौतम गंभीर राजकारणाकडे वळला. त्यानंतर दिल्लीमध्ये खासदार झाला आणि कोरोना काळात त्याने १ रुपयात जेवण हा उपक्रम सुरू केला आणि तो आजही सुरू आहे. पण, गौतम गंभीरची एकूण संपत्ती कितीय?

गौतम गंभीर हा भारताच्या सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक होता. भारताला २००चा ट्वेंटी-२० आणि २०११ चा वन डे वर्ल्ड कप जिंकून देण्यात त्याचा मोलाचा वाटा होता. भारतासाठी दोनशेहून अधिक सामने खेळल्यानंतर, गौतम गंभीरने २०१८ मध्ये क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली.

creedon.com च्या रिपोर्टनुसार, गौतम गंभीरची एकूण संपत्ती १५० कोटींच्या आसपास आहे. २०१७ ते २०१८ या कालावधीत त्याने १२ कोटी रुपये कमावले. ज्यामध्ये आयपीएल आणि देशांतर्गत सामन्यांची फी जोडण्यात आली होती. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर गंभीर राजकारणाकडे वळला.

गौतम गंभीर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पूर्व दिल्लीतून लढला आणि जिंकला. खासदार असल्याने गंभीरला १ लाख रुपये पगार मिळतो आणि याशिवाय दिल्ली प्रदेशाचे प्रमुख असल्याने त्याला महिन्याला ५० हजार रुपये वेगळे दिले जातात.

गौतम गंभीर महागड्या गाड्यांचा मालक आहे. त्याच्याकडे मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, ऑडी आणि टोयोटा कोरोलासारख्या महागड्या कार आहेत. गौतम गंभीरची कमाई केवळ आयपीएल आणि राजकारणातूनच नाही तर ब्रँड प्रमोशनमधूनही होते. गौतम 'क्रिकप्ले' या फँटसी अॅपचा ब्रँड अॅम्बेसेडरही आहे.

गंभीरने २०१८ मध्ये नताशा जैनसोबत लग्न केले. जी एका व्यापारी कुटुंबातून येते. नताशा राजघराण्यातील आहे. ती स्वतः एक व्यावसायिक महिला देखील आहे. लग्नापूर्वी ते खूप चांगले मित्र होते.