Hardik Pandya Gujarat Titans Wins IPL 2022 : मुंबई इंडियन्ससोबत जिंकलेल्या चषकापेक्षा हे जेतेपद अधिक संस्मरणीय; ऐतिहासिक विजयानंतर हार्दिक पांड्याची मोठी विधानं

Gujarat Titans Wins IPL 2022 : गुजरात टायटन्सने ( GT) रविवारी इंडियन प्रीमिअर लीग २०२२ चे जेतेपद पटकावले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरातने अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सवर ( Rajasthan Royals) ७ विकेट्स राखून विजय मिळवला.

Gujarat Titans Wins IPL 2022 : गुजरात टायटन्सने ( GT) रविवारी इंडियन प्रीमिअर लीग २०२२ चे जेतेपद पटकावले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरातने अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सवर ( Rajasthan Royals) ७ विकेट्स राखून विजय मिळवला. ३ विकेट्स व महत्त्वाच्या ३४ धावा करणाऱ्या हार्दिकला म‌ॅन ऑफ दी मॅचच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याचे हे पहिलेच जेतपद असले तरी त्याचे हे पाचवे आयपीएल जेतेपद आहे. हे जेतेपद मुंबई इंडियन्ससोबत जिंकलेल्या चार जेतेपदांपेक्षा अधिक संस्मरणीय असल्याचे विधान हार्दिकने सामन्यानंतर केले.

सर्वात कमी सामन्यांत आयपीएल जेतेपद जिंकणारा हार्दिक हा दुसरा कर्णधार ठरला. हा विक्रम रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नावावर आहे. रोहित, महेंद्रसिंग धोनी व गौतम गंभीर यांच्यानंतर हार्दिक हा आयपीएल जेतेपद पटकावणारा चौथा कर्णधार आहे. त्याने २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली मुंबई इंडियन्सचा खेळाडू म्हणून जेतेपदाचा चषक उंचावला होता अन् २०२२मध्ये त्याने कर्णधार म्हणून ही कामगिरी केली. रोहितच्या नावावर ५ जेतेपदं आहेत, किरॉन पोलार्ड, अंबाती रायुडू यांच्याही नावावर प्रत्येकी ५ जेतेपदं आहेत. महेंद्रसिंग धोनी व लसिथ मलिंगा यांनी प्रत्येकी ४ वेळा ही कामगिरी केली आहे.

हार्दिक म्हणाला,'' मी कठोर परिश्रम केले हे मला दाखवायचे होते आणि आजचा दिवस माझ्या गोलंदाजीच्या दृष्टीकोनातून होता, मी या सामन्यासाठी सर्वोत्तम गोलंदाजी वाचवून ठेवली होती. मला वाटतं माझ्या स्पेलचा दुसरा बॉल जो मी टाकला, त्यावर संजूला बाद केले, मी पाहिलं की जर तू विकेटवर जोरात चेंडू आदळाल आणि सीमवर टाकल्यास काहीतरी घडतेय. त्यामुळे मी सातत्याने तसाच मारा केला आणि फलंदाजाला चांगले फटके खेळण्याचे आव्हान देत राहिलो.''

''लोकं काय म्हणतात, याची मला पर्वा नाही आणि जर मला त्याग करावा लागत असेल आणि माझी कामगिरी निराशाजनक झाली असेल, परंतु आमचा संघ तरीही जिंकत असेल, तर मी त्याला महत्त्व देईन. मी आणि आशिष नेहरा आम्ही दोघांनी पाच गोलंदाजांसह खेळण्याचा निर्णय घेतला. ट्वेंटी-२० हा अनेकदा फलंदाजांचा खेळ म्हणून ओळखला जातो, परंतु गोलंदाज तुम्हाला सामना जिंकून देतात,'' असेही हार्दिक म्हणाला.

हार्दिक म्हणाला,''मी स्वतःला लकी समजतोय... मी पाच आयपीएल फायनल खेळलो आणि पाचही जिंकलो. हे खूप रोमांचक आहे, हे जेतेपद खास असणार आहे कारण आम्ही एक लेगसी तयार करण्याबाबत बोलतोय. हे येणार्‍या पिढीसाठी आहे, प्रत्येकाच्या लक्षात असायला हवे की या संघाने हा प्रवास सुरू केला आणि पहिल्याच वर्षी जेतेपद जिंकणे खूप खास आहे. मी याआधी जिंकलेल्या आयपीएल चषकांपैकी हा विजय संस्मरणीय आहे.''