David Warner IPL 2022, SRH vs DC Live Updates : एक रन घेऊन तुला स्ट्राईक देतो, तू शतक पूर्ण कर!; पॉवेलच्या वाक्यावर डेव्हिड वॉर्नरचं मन जिंकणारं उत्तर!

IPL 2022, Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals Live Updates : डेव्हिड वॉर्नर व रोव्हमन पॉवेल या जोडीनं आज सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. ८ वर्षांनंतर हैदराबादविरुद्ध खेळणाऱ्या वॉर्नरने ( David Warner) आपल्या कामगिरीतून मागील पर्वातील अपमानाची सव्याज परतफेड केली.

IPL 2022, Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals Live Updates : डेव्हिड वॉर्नर व रोव्हमन पॉवेल या जोडीनं आज सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. ८ वर्षांनंतर हैदराबादविरुद्ध खेळणाऱ्या वॉर्नरने ( David Warner) आपल्या कामगिरीतून मागील पर्वातील अपमानाची सव्याज परतफेड केली.

त्यानं चौथ्या विकेटसाठी पॉवेलसह ( Rovman Powell) ६६ चेंडूंत १२२ धावांची नाबाद भागीदारी करताना दिल्ली कॅपिटल्सला ३ बाद २०७ धावांचा डोंगर उभा करून दिला. १९वं षटक संपल्यानंतर पॉवेल ४९, तर वॉर्नर ९२ धावांवर खेळत होता. त्यामुळे अखेरच्या षटकात सर्वांना वॉर्नरच्या शतकाची प्रतीक्षा होती. स्ट्राईकवर असलेल्या पॉवेलनेही १ धाव काढून तुला स्ट्राईक देतो असे म्हटले, पण वॉर्नर जे म्हणाला ते कौतुकास्पद होते..

मनदीप सिंग ( ०) पहिल्याच षटकात माघारी परतल्यानंतर वॉर्नर व मिचेल मार्श यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. भुवनेश्वर कुमारने चांगली सुरूवात करून दिली. भुवीने त्याच्या पहिल्या दोन षटकांत ११ चेंडू निर्धाव फेकले व १ धाव देत १ विकेट घेतली. सीन अ‍ॅबोटने DC ला दुसरा धक्का देताना मार्शला ( १०) माघारी पाठवले.

रिषभ पंत व वॉर्नर यांनी २९ चेंडूंत ४८ धावांची भागीदारी करून दिल्लीची गाडी रुळावर आणली. श्रेयस गोपाळने टाकलेल्या ९व्या षटकात वॉर्नरने पहिल्या चेंडूवर एक धाव काढून रिषभला स्ट्राईक दिल्यानंतर रिषभने पुढील चार चेंडूंवर ६, ६, ६, ४ अशी बरसात केली. पण, ६व्या चेंडूवर रिषभ चूकला व बॅटची कड घेत चेंडू यष्टिंवर आदळला. रिषभला १६ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह २६ धावांवर माघारी जावं लागलं.

त्यानंतर वॉर्नर व पॉवेल ही जोडी बरसली. वॉर्नरने ट्वेंटी-२०तील ८९वे अर्धशतक पूर्ण करून विश्वविक्रमाला गवसणी घातली. त्याने ख्रिस गेलचा ( Chris Gayle) ८८ अर्धशतकांचा विक्रम मोडला. विराट कोहली ७६ अर्धशतकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. २०वे षटक पॉवेलनेच खेळून काढल्याने वॉर्नरचे शतक होऊ शकले नाही. वॉर्नर ५८ चेंडूंत १२ चौकार व ३ षटकारांसह ९२ धावांवर नाबाद राहिला. पॉवेलने ३५ चेंडूंत ३ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ६७ धावा केल्या.

४९ धावांवर खेळत असलेल्या पॉवेलने २०व्या षटकाला सुरूवात होण्यापूर्वी वॉर्नरला एक धाव काढून स्ट्राईक देतो अन् शतक पूर्ण कर असे सांगितले. त्यावर वॉर्नर काय म्हणाला हे पॉवेलने सामन्यानंतर सांगितले.

पॉवेलने सांगितले की,''मी एक धाव घेऊन तुला स्ट्राईक देतो तू शतक पूर्ण कर, असे मी वॉर्नरला विचारले. तो म्हणाला, हे असं क्रिकेट आपण खेळत नाही आणि जा जाऊन बेधडक फटकेबाजी कर.'' वॉर्नरच्या या वाक्याने पॉवेलला ताकद मिळाली आणि त्याने त्या षटकात पॉवेलने १९ धावा चोपून काढल्या.

२०१४मध्ये सनरायझर्स हैदराबादने वॉर्नरला करारबद्ध केले. त्यानंतर २०१५, २०१७ व २०१९ साली या संघाकडून वॉर्नरने ऑरेंज कॅप जिंकली आणि २०१६मध्ये हैदराबादला मिळालेलं एकमेव जेतेपद हे वॉर्नरच्याच नेतृत्वाखाली आहे.

तरीही मागील दोन पर्वात अपयश आल्यामुळे फ्रँचायझीने वॉर्नरला अपमानास्पद वागणूक दिली. त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतलेच, शिवाय त्याला अंतिम ११मधूनही बाहेर केले. हैदराबादसाठी वॉर्नरने ९५ सामन्यांत ४९.५५च्या सरासरीने ४०१४ धावा केल्या आहेत. त्यात ४० अर्धशतकं व २ शतकांचा समावेश आहे.