IPL 2022 Mega Auction : भारताच्या 'या' पाच फलंदाजांसाठी फ्रँचायझींमध्ये चुरस रंगणार; यातून काही कर्णधारही बनणार

IPL 2022 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी होणाऱ्या मेगा ऑक्शनमध्ये यंदा १० संघ सहभाग घेणार आहेत.

IPL 2022 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी होणाऱ्या मेगा ऑक्शनमध्ये यंदा १० संघ सहभाग घेणार आहेत. आयपीएलमधील पुढील वाटचाल सुखरूप करण्यासाठी हे सर्व संघ मजबूत संघबांधणीसाठी प्रयत्नशील असणार आहेत. यापैकी काही संघ तर कर्णधाराच्याच शोधात आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून भारताच्या पाच प्रमुख फलंदाजांची डिमांड वाढलेली पाहायला मिळेल.

मागील काही वर्षांत युवराज सिंग, गौतम गंभीर, लोकेश राहुल आणि मनिष पांडे यांनी फ्रँचायझींकडून तगडी रक्कम घेतली. पण, शनिवार-रविवार होणाऱ्या लिलावात युवा फलंदाजांवर सर्वांचे लक्ष असणार आहे. जाणून घेऊयात भारताच्या कोणत्या पाच फलंदाजांना सर्वाधिक भाव मिळू शकतो.

श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) - भारतीय संघातील मधल्या फळीचा हा फलंदाज यंदाच्या लिलावात सर्वाधिक महागडा खेळाडू ठरू शकतो. दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार श्रेयस अय्यर याला २ कोटींच्या मुळ किंमतीतील खेळाडूंमध्ये ठेवले गेले आहे. आयपीएलमद्ये त्याने ८७ सामन्यांत ३१.६६च्या सरासरीने २३७५ धावा केल्या आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्लीने २०२०मध्ये प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे ज्या फ्रँचायझी कर्णधाराच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी हा योग्य पर्याय ठरू शकतो.

इशान किशन ( Ishan Kishan ) - मुंबई इंडियन्सला इच्छा नसतानाही या युवा फलंदाजाला रिलीज करावं लागलं, परंतु त्याला पुन्हा ताफ्यात घेण्यासाठी माजी विजेते नक्की प्रयत्न करतील. सलामी, मधली फळी किंवा फिनिशर या कोणत्याही भूमिकेत फिट बसणारा हा यष्टिरक्षक-फलंदाज सर्व फ्रँचायझींना हवा आहे. २३ वर्षीय इशान किशनकडे भविष्याचा कर्णधार म्हणूनही पाहिले जात आहे.

देवदत्त पडिक्कल ( Devdutt Padikkal ) - आयपीएलच्या २९ सामन्यांत RCBचे प्रतिनिधित्व करताना ८८४ धावांची खेळी करणाऱ्या देवदत्तसाठी कोणतीही फ्रँचायझी आनंदाने पैसे ओतेल. त्याच्या नावावर एक शतक व ६ अर्धशतकं आहेत. भारतीय क्रिकेटमध्ये भविष्याचा सुपरस्टार सलामीवीर म्हणून देवदत्तकडे पाहिले जात आहे.

शिखर धवन ( Shikhar Dhawan ) - भारताचा अनुभवी सलामीवीर शिखर धवनला दिल्ली कॅपिटल्सने रिलीज केले. धवनने आयपीएलच्या मागील दोन पर्वात दोन शतकं व ७ अर्धशतकांसह १२०५ धावा केल्या आहेत. ज्या फ्रँचायझी सलामीवीराच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी हा सक्षम पर्याय ठरू शकतो.

शाहरुख खान ( Shahrukh Khan ) - तामिळनाडूच्या या फलंदाजानं सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत दमदार कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. विजय हजारे ट्रॉफीत त्याने ८ सामन्यांत १८६.०३च्या स्ट्राईक रेटने २५३ धावा चोपल्या आहेत. एक परफेक्ट फिनिशर म्हणून त्याची निवड केली जाऊ शकते.