Mumbai Indians, IPL 2022 Mega Auction : शार्दूल ठाकूर, इशान किशन यांच्यासह 'दहा' खेळाडूंसाठी मुंबई इंडियन्स असणार प्रयत्नशील; जाणून घ्या लिस्ट

IPL 2022 Mega Auction: इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) मेगा ऑक्शनसाठी सज्ज झाला आहे.

IPL 2022 Mega Auction: इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) मेगा ऑक्शनसाठी सज्ज झाला आहे. दोन नव्या फ्रँचायझी दाखल झाल्यामुळे हे ऑक्शन घ्यावे लागत आहे आणि त्यामुळे इतकी वर्ष सोबत खेळणारे खेळाडू आता विभक्त झाले आहेत. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स यांनी मजबूत संघबांधणी केली होती, परंतु आता त्यांनाही पुन्हा नव्यानं संघबांधणी करावी लागणार आहे.

मुंबई इंडियन्सनं कर्णधार रोहित शर्मा, जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह, अष्टपैलू किरॉन पोलार्ड आणि मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव यांना IPL 2022साठी संघात कायम राखले. आता मुंबई इंडियन्सच्या पर्समध्ये ४८ कोटी शिल्लक आहेत आणि त्यात त्यांना १४ भारतीय व ७ परदेशी असे २१ खेळाडू आपल्या ताफ्यात घ्यायचे आहेत.

मुंबई इंडियन्सने जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, इशान किशन व राहुल चहर या युवा खेळाडूंना घडवलं. त्यामुळे आता आगामी ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्स विस्कटलेली घडी पुन्हा नव्यानं बसवण्याचा प्रयत्न करणार आहेत. जाणून घेऊयात मुंबई इंडियन्स कोणत्या १० खेळाडूंसाठी प्रयत्नशील असू शकतील.

इशान किशन ( Ishan Kishan ) - मुंबई इंडियन्सनं यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनला रिलीज केले असले तरी त्यानं आयपीएलमध्ये आपली छाप पाडली आहे. त्यामुळेच २०२१च्या वर्ल्ड कप स्पर्धेत त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली. मुंबई इंडियन्स पुन्हा त्याला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी प्रयत्नशील असतील. २३ वर्षीय फलंदाज सलामी व मधल्या फळीतही खेळू शकतो. त्याच्याकडे संघाचा भविष्याचा कर्णधार म्हणूनही पाहिले जात आहे.

क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock ) - क्विटन डी कॉक हाही मुंबई इंडियन्सचा सदस्य होता. २९ वर्षीय क्विंटनने मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्मासह सलामीला अनेक अविस्मरणीय खेळी केल्या आहेत. त्यानं आयपीएलमध्ये ७७ सामन्यांत ३१.३३ च्या सरासरीनं २२५६ धावा केल्या आहेत. मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने क्विंटनला ताफ्यात पुन्हा घेण्यासाठी आग्रही आहेत.

देवदत्त पडिक्कल ( Devdutt Padikkal ) - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा माजी सलामीवीर देवदत्त यानं आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. हा डावखुरा फलंदाज रोहित शर्मासह मुंबई इंडियन्ससाठी सलामीला खेळताना दिसू शकतो. देवदत्तनं २९ सामन्यांत ८८४ धावा केल्या आहेत. २१ वर्षीय देवदत्तवर कोणतीही फ्रँचायझी भविष्याचा विचार करून पैसा ओतण्यास उत्सुक असेल.

रॅसी व्हॅन डेर ड्युसेन ( Rassie van der Dussen ) - दक्षिण आफ्रिकेचा हा फलंदाज चांगल्या फॉर्मात आहे. एबी डिव्हिलियर्सच्या निवृत्तीनंतर आफ्रिकन संघात ड्युसेननं मधल्या फळीत चांगली कामगिरी केली आहे. त्याच्याकडे IPLचा अनुभव नसला तरी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त त्याने ३४ सामन्यांत ९३३ धाव केल्या आहेत.

मिचेल मार्श ( Mitchell Marsh ) - बिग बॅश लीग गाजवणाऱ्या अष्टपैलू मिचेल मार्शला हा मुंबई इंडियन्ससाठी हार्दिक पांड्याचा पर्याय ठरू शकतो. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या विजयात मिचेल मार्शने महत्त्वाचा भूमिका बजावली होती.

शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur ) - चेन्नई सुपर किंग्सचा माजी अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूर याचा फॉर्म बोलका आहे. भारतीय संघही त्याच्याकडे परफेक्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहत आहेत. आयपीएल २०२२च्या लिलावात शार्दूलसाठी तगडी रक्कम मोजली जाण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या मागील पर्वात त्याने २१ विकेट्स घेताना CSKच्या जेतेपदाच महत्त्वाचा वाटा उचलला.

हर्षल पटेल ( Harshal Patel ) - RCBकडून मागील पर्वात सर्वाधिक विकेट्स घेऊन पर्पल कॅपचा मानकरी ठरलेल्या हर्षल पटेल हा मुंबई इंडियन्ससाठी डेथ ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहला चांगली साथ देऊ शकतो. त्याची शिस्तबद्ध गोलंदाजी आणि अचूक यॉर्कर प्रतिस्पर्धींच्या धावांवर अंकुश ठेवते. त्याने मागील पर्वात ३२ विकेट्स घेतल्या आहेत.

ट्रेंट बोल्ट ( Trent Boult ) - आयपीएल २०२०मध्ये मुंबई इंडियन्सने न्यूझीलंडचा गोलंदाज ट्रेंट बोल्टला दिल्ली कॅपिटल्सकडून ट्रेड केले होते. त्यानेच अंतिम सामन्यात दिल्लीविरुद्ध दमदार कामगिरी करून मुंबईला आणखी एक जेतेपद पटकावून दिले होते. मागील दोन पर्वात बोल्टने मुंबईसाठी ३८ विकेट्स घेतल्या आहेत.

कागिसो रबाडा ( Kagiso Rabada ) - मुंबई इंडियन्स नेहमीच जलदगती गोलंदाजांमध्ये गुंतवणूक करत आली आहे. लसिथ मलिंगा, जसप्रीत बुमराह किंवा ट्रेंट बोल्ड हे त्याचे उदाहरण आहे. कागिसो रबाडा ऑक्शनमध्ये आल्याने मुंबई इंडियन्सला आणखी एक डेथ ओव्हर स्पेशालिस्ट संघात घेता येईल. त्याने ५० सामन्यांत ७६ विकेट्स घेतल्या आहेत.

राहुल चहर ( Rahul Chahar ) - राहुल चहरला मुंबई इंडियन्स पुन्हा ताफ्यात घेऊ शकतील. २०१८मध्ये मुंबईने त्याच्यासाठी १.९० कोटी मोजले होते. राहुलने ४२ सामन्यांत ४३ विकेट्स घेतल्या आहेत.