Video : अश्रू, मिठी अन् आनंद; IPL 2021 स्थगित झाल्यानंतर २६ दिवसांनी कुटुंबीयांना भेटले ऑस्ट्रेलियन खेळाडू!

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं बीसीसीआयचा बायो-बबल भेदल्यानंतर इंडियन प्रीमिअर लीग २०२१ स्थगित करावी लागली. त्यानंतर सर्व खेळाडू आपापल्या घरी परतले. परदेशी खेळाडूंना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी बीसीसीआयनं चार्टर्ड फ्लाईटची सोय केली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे काही देशांनी भारतातून येणाऱ्या विमानसेवा रद्द केल्या होत्या आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मालदिवचा सहारा घ्यावा लागला.

तेथे १४ दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीनंत ऑसी खेळाडू मायदेशात दाखल झाले, परंतु सरकारच्या नियमानुसार त्यांना तेथेही हॉटेलमध्ये क्वारंटाईन व्हावं लागले. पण, २६ दिवसांनंतर अखेर ऑस्ट्रेलियन खेळाडू त्यांच्या कुटुंबीयांना भेटले अन् त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. कुटुंबीयांना भेटताना ऑसी खेळाडू भावनिक झाले होते.

ऑस्ट्रेलियन गोलंदाज पॅट कमिन्स याला भेटण्यासाठी त्याची गर्भवती पत्नी आली होती आणि या दोघांच्या भेटीनं सर्वांना इमोशनल केलं.