IPL 2021, MI vs RCB Match Highlights : त्या पाच षटकांनी घात केला, फ्रंटसिटवर बसलेला मुंबई इंडियन्सचा संघ बॅकसिटवर फेकला गेला

IPL 2021, Royal Challengers Bangalore vs Mumbai Indians Match Highlights : मुंबई इंडियन्सला ( MI) आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला.

IPL 2021, Royal Challengers Bangalore vs Mumbai Indians Match Highlights : मुंबई इंडियन्सला ( MI) आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं ( RCB) उत्तम सांघिक कामगिरी करून मुंबईला लाजीरवाण्या पराभवाचा सामना करण्यास भाग पाडले. या निकालानंतर विराट कोहलीच्या संघानं १२ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावरील पकड मजबूत केली, तर रोहित शर्माच्या संघाची सातव्या स्थानी घसरण झाली. चांगली सुरुवात करूनही त्या पाच षटकांत मुंबई इंडियन्सच्या हातून हा सामना निसटला.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा ( RCB) कर्णधार विराट कोहलीनं ज्या प्रकारे डावाची सुरुवात केली, ते पाहता हा संघ १९० + धावा सहज उभ्या करतील असे वाटत होते. पण, जसप्रीत बुमराह व ट्रेंट बोल्ट यांच्या अखेरच्या स्पेलनं सर्व गणित बिघडवलं.

विराटनं डावाच्या दुसऱ्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून त्याचा मनसूबा स्पष्ट केला. पण, जसप्रीतनं दुसऱ्या षटकात देवदत्त पडिक्कलला बाद करून मोठा धक्का दिला. श्रीकर भारतनं दुसऱ्या विकेटसाठी विराटला उत्तम साथ दिली, परंतु त्यांच्या धावांची गती संथ होती.

रोहित शर्मानं त्याच्या गोलंदाजांचा कल्पकतेनं वापर करताना RCB च्या धावांवर चाप बसवला होता. पण, ग्लेन मॅक्सवेल आला अन् धावांची गती वाढली. फिरकी असो किंवा जलदगती गोलंदाज मॅक्सवेलनं सर्वाना रिव्हर्स स्वीप मारून हैराण केलं. विराटनं १३वी धाव घेऊन ट्वेंटी-२०तील १० हजार धावा पार केल्या.

विराट खेळपट्टीवर असेपर्यंत RCB निर्धास्त होते. पण, ट्रेंट बोल्टनं १५व्या षटकात फक्त दोन धावा देत RCBवरील दडपण वाढवले आणि त्यामुळे पुढील षटकात अॅडम मिलनेच्या शॉर्ट बॉलवर विराट फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. विराटनं ४२चेंडूंत ५१ धावा केल्या. त्याच्या या खेळीत ३ चौकार व ३ षटकारांचा समावेश होता.

ग्लेन मॅक्सवेल सुसाट सुटला व त्याला एबी डिव्हिलियर्सचीही साथ मिळत होती. पण, जसप्रीतनं १९व्या षटकात ६ धावा देत सलग दोन चेंडूंवर या दोघांना तंबूत पाठवले. ट्रेटं बोल्टनंही २०व्या षटकात फक्त तीन धावा दिल्या. त्यामुळे RCBला ६ बाद १६५ धावांवर समाधान मानावे लागले.

रोहित शर्मा ( 43) व क्विंटन डी कॉक ( 24) यांनी वादळी सुरुवात करून दिली खरी, परंतु ही जोडी माघारी परतताच RCBनं डोकं वर काढलं. युझवेंद्र चहल व ग्लेन मॅक्सवेल यांनी MIच्या फलंदाजांना नाचवलं. MIला ११ ते १५ षटकांत २० धावा करता आल्या आणि त्यांनी ४ विकेट्स गमावल्या.

रोहित शर्मा व क्विंटन डी कॉक यांच्या सॉलिड सुरुवातीनंतरही मुंबई इंडियन्सची ( MI) गाडी घसरली. युझवेंद्र चहल व ग्लेन मॅक्सवेल यांच्या फिरकीनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला ( RCB) पुनरागमन करून दिले. ११ ते १५ व्या षटकात सामना ९० अंशाच्या कोनानं फिरला अन् फ्रंट सिटवर बसलेला मुंबई इंडियन्सचा संघ अगदी सहजतेनं बॅकसीटवर फेकला गेला. त्या पाच षटकांत मुंबई इंडियन्सनं २० धावांत ४ फलंदाज गमावले.

डॅन ख्रिस्टिननं १६व्या षटकात सर्व चेंडू लेग साईटला फेकून फक्त ६ धावाच दिल्या. त्यामुळे २४ चेंडूंत ६१ धावा MIला बनवायच्या होत्या. आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात पहिलाच सामना खेळणारा हार्दिक पांड्या ३ धावांवर विराटच्या हाती झेल देऊन बाद झाला. हर्षल पटेलनं पुढच्याच चेंडूवर किरॉन पोलार्डचा ( ७) त्रिफळा उडवला अन् मुंबई इंडियन्सच्या हातून सामना खेचून आणला.

या सामन्यात मॅक्सवेलनं अष्टपैलू कामगिरी करताना ३७ चेंडूंत ५६ धावा केल्या अन् २३ धावांत २ विकेट्स घेतल्या. हर्षल पटेलनं १७व्या षटकात हॅटट्रिक घेत RCBचा विजय पक्का केला. चहलनं ११ धावांत ३ विकेट्स घेतल्या. हर्षलनं १७ धावांत ४ विकेट्स घेतल्या. बंगलोरच्या १६५ धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ १११ धावांत तंबूत परतला.