Join us  

IPL 2021: अजिंक्य रहाणेमुळे IPLच्या वेळापत्रकात बदल?, एकाच वेळी दोन सामने होणार, काय आहे यामागची कहाणी? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 11:05 AM

Open in App
1 / 10

आयपीएलच्या वेळापत्रकात बीसीसीआयनं ऐनवेळी एक महत्त्वाचा बदल केला आहे. साखळी फेरीतील शेवटचे दोन सामने आता एकाच वेळी म्हणजेच सायंकाळी ७.३० वाजता खेळवले जाणार आहेत.

2 / 10

आधीच्या वेळापत्रकानुसार ८ ऑक्टोबरला सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स हा सामना दुपारी 3.30 वाजल्यापासून, तर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर वि. दिल्ली कॅपिटल्स हा सामना सायंकाळी 7.30 वाजल्यापासून सुरू होणार होते. पण, आता दोन्ही सामने सायंकाळीच खेळवले जातील.

3 / 10

साखळी फेरीतील सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यामागे एक मोठं कारण समोर आलं आहे. ऐनवेळी संघांमध्ये आणि सामन्याच्या निकालावरुन वाद निर्माण होऊ नये म्हणून बीसीसीआयनं असा निर्णय घेतला आहे. लीग स्टेजच्या अखेरच्या टप्प्यात प्ले-ऑफमध्ये आपलं स्थान निश्चित करण्यासाठी संघांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळतो.

4 / 10

प्ले-ऑफमध्ये दावेदारी सिद्ध करण्यासाठी संघांचे गुण समान असले तर त्यांच्या नेट रनरेटवरुन संघांच्या गुणतालिकेतील जागा ठरते. आयपीएलच्या मागील पर्वात असाच एक वाद निर्माण झाला होता. ज्यात अजिंक्य रहाणेनं संथ गतीनं केलेल्या फलंदाजीबाबत टीका टिप्पणी केली गेली होती.

5 / 10

आयपीएलमध्ये गेल्या वर्षी साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यातील गणित नेट रनरेटवर येऊन ठेपलं होतं. त्यावेळी आरसीबी विरुद्ध दिल्ली कॅपिटल्समधील सामन्यात असं गणित निर्माण झालं होतं की विराट कोहलीच्या संघाला प्ले-ऑफमध्ये स्थान प्राप्त करण्यासाठी दिल्लीला १८ व्या षटकाच्या पूर्वी जिंकण्यापासून रोखायचं होतं. दिल्लीनं १८ व्या षटकापूर्वीच आरबीसीचं आव्हान गाठलं असतं तर आरसीबीच्या नेट रनरेटमध्ये घसरण झाली असती आणि पाचव्या स्थानावर संघ फेकला गेला असता.

6 / 10

अजिंक्य रहाणेनं या सामन्यात संथ गतीनं फलंदाजी केली होती. यामुळे दिल्लीनं सामना जिंकला खरा पण बंगलोर संघाचं प्ले-ऑफमधील स्थान निश्चित झालं होतं. तर कोलकाता नाइट रायडर्स संघाला पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. त्यामुळे केकेआरचं प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याचं आव्हान संपुष्टात आलं होतं.

7 / 10

आयपीएलच्या यंदाच्या पर्वातही प्ले-ऑफमध्ये चौथ्या स्थानासाठी दोन-तीन संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळे अशावेळी कोणताही वाद निर्माण होऊ नये यासाठीच बीसीसीआयनं खबरदारी म्हणून सामन्याचा वेळच बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

8 / 10

यंदाही प्ले-ऑफसाठीचं चौथ्या क्रमांकाचं स्थान नेट रनरेटवरुन निश्चित करण्याची वेळ येईल असंच चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे साखळी फेरीतील शेवटचे दोन सामने एकाच वेळी खेळवले गेले तर प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी दावेदारी ठोकणारा संघ सहजपणे प्राप्त होईल आणि रन रेट योग्य न राखल्याचं खापर कोणत्याही खेळाडूवर फोडलं जाणार नाही.

9 / 10

याशिवाय, एकाच वेळी दोन सामने खेळविण्यामागचं दुसरं कारण टीआरपी असल्याचं देखील बोललं जात आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, दुपारी खेळवल्या जाणाऱ्या सामन्याला संध्याकाळच्या सामन्यापेक्षा कमी टीआरपी मिळतो. त्यामुळे टीआरपी वाढविण्यासाठी स्टार इंडियाकडून बीसीसीआयला एकाच वेळी दोन सामने खेळविण्याचा प्रयोग करण्यासाठी तयार करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

10 / 10

यासोबतच एकाच वेळी दोन सामने खेळविण्यामागे भविष्यातील रणनितीची चाचपणी बीसीसीआय करत असल्याचंही सांगितलं जात आहे. कारण पुढील वर्षापासून आयपीएलमध्ये आणखी दोन संघ नव्यानं दाखल होणार आहेत. त्यामुळे स्पर्धेतील एकूण सामन्यांची संख्या देखील वाढणार आहे. अशावेळी एकाच वेळी तीन सामने खेळवण्याची योजना बीसीसीआय आखत आहे. एक सामना दुपारी आणि दोन सामने संध्याकाळी एकाच वेळी खेळवता येतील का याबाबत चाचपणी सुरू आहे.

टॅग्स :आयपीएल २०२१अजिंक्य रहाणेदिल्ली कॅपिटल्स
Open in App