Inzamam-Ul-Haq, Pakistan: इंझमाम-उल-हकने पाकिस्तान फलंदाजांची लाजच काढली, म्हणाला...

पाकिस्तानी फलंदाज फायनलमध्ये मोक्याच्या क्षणीच ढेपाळले

Inzamam-Ul-Haq slams Pakistan, ENG vs PAK: T20 World Cup 2022 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तान संघाला इंग्लंडविरुद्ध ५ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. पाकिस्तानी गोलंदाजांनी छोट्या आव्हानाचा बचाव करण्याचा अतोनात प्रयत्न केला, पण फलंदाजांनी केलेल्या सुमार कामगिरीमुळे अखेर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम-उल-हकने फलंदाजांची अक्षरश: लाज काढली.

फायनलसारख्या महत्वाच्या सामन्यात पाकिस्तानला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली, पण त्यांचे फलंदाज ढेपाळले. सॅम करनच्या गोलंदाजीमुळे पाकला २० षटकांत १३७ धावाच करता आल्या. ३८ धावांची खेळी करणारा शान मसूद त्यांचा सर्वोकृष्ट फलंदाज ठरला.

आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या गोलंदाजांनी तुफानी कामगिरी केली. शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह, हॅरिस रौफ आणि मोहम्मद वासिम चौघांनीही वेगवान आणि शिस्तबद्ध मारा करत इंग्लिश फलंदाजांना नाकीनऊ आणले होते. पण आफ्रिदीच्या दुखापतीमुळे सामना फिरला आणि बेन स्टोक्सने अर्धशतक ठोकत संघाला विजय मिळवून दिला.

पाकिस्तानच्या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी खेळाडू इंझमाम उल हकने मोठे वक्तव्य केले. इंझमामने गोलंदाजांच्या लढाऊ बाण्याचे तोंडभरून कौतुक केले. पण फलंदाजांच्या कामगिरीबाबत त्याने अतिशय स्पष्ट शब्दांत निराशा व्यक्त केली आणि त्यांच्यावर टीका केली.

“पाकिस्तानला विश्वचषक जिंकण्याची मोठी संधी होती, पण ते करू शकले नाहीत हे थोडे निराशाजनक आहे. मला खेळाडूंचे कौतुक करायलाच हवे, कारण अंतिम फेरीत येणे हा काही छोटासा प्रयत्न नाही आणि फायनल खेळणे ही एक मोठी गोष्ट आहे. अशा धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानवर खूप दडपण आले असते. पण पाकिस्तानी गोलंदाजांनी चांगला प्रयत्न केला. चांगली गोष्ट म्हणजे त्यांची देहबोली उत्कृष्ट होती," अशा शब्दात त्याने गोलंदाजांचे कौतुक केले.

पुढे बोलताना इंझमाम-उल-हक म्हणाला, "मला वाटतं की धावसंख्या थोडी कमी होती. पाकिस्तानने १५-१६व्या षटकापर्यंत चांगली फलंदाजी केली होती, पण शेवटच्या चार-पाच षटकांत सगळी निराशा झाली. फलंदाजांना २०-२५ धावा काढण्यात अपयश आले. मला विश्वास आहे की १६० ते १७० ही धावसंख्या पाकिस्तानसाठी चांगली ठरली असती. पण तसं घडलेलं दिसलं. फलंदाजांनी चांगली कामगिरी करायला हवी होती."