IND vs NZ: 'देवा, आमच्या पंतला लवकर बरा कर'; टीम इंडियाच्या खेळाडूंचं उज्जैनच्या महाकालेश्वराला साकडं

Rishabh pant: भारतीय क्रिकेटपटूंनी रिषभ पंत लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली आहे.

सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वन डे मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील पहिले 2 सामने जिंकून यजमान संघाने 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. उद्या मंगळवारी या मालिकेतील शेवटचा सामना इंदौर येथे होत आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ रविवारी इंदौरला पोहचला. इथे स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराला भेट देऊन बाबा महाकाल यांची आरती केली.

याशिवाय भारतीय खेळाडूंनी आपला सहकारी रिषभ पंत लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली. माध्यमांशी संवाद साधताना सूर्यकुमार यादवने माहिती दिली.

"आम्ही रिषभ पंत लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली. त्याचे पुनरागमन आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आम्ही न्यूझीलंडविरूद्ध आधीच मालिका जिंकलो आहे, त्यांच्याविरूद्धच्या अखेरच्या सामन्याची वाट पाहत आहे", असे सूर्याने सांगितले.

21 जानेवारी रोजी रायपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे. रोहित शर्मा अँड कंपनीने न्यूझीलंडचा दुसऱ्या वन डे सामन्यात आठ गडी राखून पराभव करून किवीविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.

भारतीय संघाने 2023 च्या विश्वचषकाच्या आधी घरच्या मैदानावर बलाढ्य संघाना पराभवाची धूळ चारली आहे. वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि न्यूझीलंडला पराभूत करून भारताने विश्वचषक जिंकण्याच्या दिशेने पाऊले टाकली आहेत.

न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. या सामन्यात मोहम्मद शमीने तीन, हार्दिक पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 2-2 बळी घेतले. तर शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले.

दुसऱ्या वन डे सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा संघ 34.3 षटकात 108 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात भारताने लक्ष्याचा पाठलाग आठ गडी आणि 29.5 षटके राखून केला.