"डेटवर जायचं नसून तुझ्याशी लग्नच करायचंय", चहलचा मोठा खुलासा; धनश्रीनं दिला होता नकार

yuzvendra chahal news : सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या धनश्री आणि युझवेंद्र यांची प्रेमकहाणी फारच रंगतदार आहे.

भारतीय संघाचा खेळाडू आणि आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा (rajasthan royals) प्रमुख फिरकीपटू युजवेंद्र चहल नेहमी सहकारी खेळाडूंशी मस्ती करत असतो. चहल त्याच्या विनोदी शैलीमुळे नेहमी चर्चेत असतो.

चहलची पत्नी धनश्री वर्मा ही पेशाने एक कोरियोग्राफर आहे. सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या धनश्री आणि युझवेंद्र यांची प्रेमकहाणी फारच रंगतदार आहे. अलीकडेच चहलने दिलेल्या एका मुलाखतीत यातील काही मजेशीर किस्से सांगितले आहेत.

युझवेंद्र चहल क्रिकेटच्या मैदानावर आपल्या अप्रतिम खेळीने चाहत्यांचे लक्ष वेधत असतो. तर त्याची पत्नी धनश्री वर्मा तिच्या डान्स स्टेप आणि ग्लॅमरस लूकमुळे नेहमी चर्चेत असते. चहलप्रमाणे त्याची पत्नी धनश्री वर्माचे देखील सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स आहेत.

कोरोना काळात लॉकडाऊन दरम्यान या दोघांची ओळख झाली अन् आता त्यांनी स्वत:ची नवीन ओळख निर्माण केली आहे. धनश्री आणि युझवेंद्र यांची ओळख नृत्याचे धडे घेत असताना झाली. धनश्री वर्मा एक लोकप्रिय डान्सर आहे, ती अनेकांना नृत्यांचे धडे देत असते.

आपल्या डान्स स्टेप्स आणि ग्लॅमरस लूकमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली धनश्री नेहमी तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते. नृत्यकला शिकताना या दोघांचा संवाद वाढला आणि डिसेंबर २०२० मध्ये दोघांनी लग्न केले.

आता चहलने त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल एक किस्सा सांगितला आहे. चहलने सांगितले, "जेव्हा कोरोनामुळे लॉकडाऊन लागले. तेव्हा मी माझ्या कुटुंबासोबत राहिलो. पहिल्यांदाच मी माझ्या गुरुग्रामच्या घरी इतका वेळ राहिलो होतो. जवळपास तीन-चार महिने. मी माझ्या कुटुंबासोबत आणि माझ्या पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवला."

"तेव्हा मला वाटले की, हे माझ्याकडे नेहमीच होते. पण मला डान्समध्ये देखील आवड आहे. मग मला धनश्रीने ऑनलाइन क्लासेस देईन असे सांगितले. म्हणून मी दोन महिने ऑनलाइन क्लासेसद्वारे नृत्याचे धडे घेतले", असे चहलने 'ह्युमन्स ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

चहलने आणखी सांगितले की, मग एके दिवशी मी धनश्रीला विचारले, तू आयुष्यात इतकी आनंदी का आहेस? तेव्हा तिने (धनश्री) उत्तर दिले, "मी तशीच आहे. मी आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधते."

त्याने धनश्रीला प्रपोज करताना काय म्हटले हे सांगताना चहलने म्हटले, "मी सर्वप्रथम तिला म्हटलो, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, तुला डेट करायचे नाही. मला डेटिंगमध्ये वेळ घालवायचा नाही. तेव्हा मी 30 वर्षांचा होतो."

यावर बोलताना धनश्री वर्माने सांगितले, "नाही, मला तुला आधी भेटायचे आहे." त्याआधी आम्ही कधीच भेटलो नाही. आम्ही मुंबईत भेटलो आणि मग ती म्हणाली, "ठीक आहे", मग लग्नाला होकार मिळाला असा खुलासा चहलने केला आहे.