Join us  

भारतीय क्रिकेटर महिनाभर खोलीत रडला, प्रेयसीही सावरू शकली नाही पण धोनी आला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 7:42 PM

Open in App
1 / 8

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेला वन डे एक सामना त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट क्षण असल्याचे म्हटले आहे. मोहालीत खेळल्या गेलेल्या त्या सामन्यातील एका षटकाने त्याच्या वन डे कारकिर्दीची दिशाच बदलल्याचे इशांत सांगतो.

2 / 8

कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंगला अडचणीत आणणाऱ्या इशांतला अजूनही वाटते की त्याच्यात मर्यादित षटकांमध्ये बरेच काही करण्याची क्षमता होती परंतु कांगारूंच्या फलंदाजाने एका षटकात त्याच्या आशा धुळीस मिळवल्या.

3 / 8

इशांत शर्मा त्या सामन्याबद्दल बोलत होता, ज्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू जेम्स फॉकनरने त्याच्या एका षटकात 4 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 30 धावा केल्या होत्या. त्या सामन्यात भारताची वाटचाल विजयाकडे होती. पण इशांतच्या एका षटकाच्या मदतीने ऑस्ट्रेलियाने सामन्यात पुनरागमन केले होते.

4 / 8

ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 3 षटकात 44 धावांची गरज होती. कांगारू संघाच्या फक्त 4 विकेट शिल्लक होत्या. फॉकनरने अर्धशतक झळकावल्यानंतर ॲडम वोजेस दुसऱ्या टोकाला उपस्थित होता. इशांतच्या एका षटकात फॉकरने धावांचा पाऊस पाडला आणि ऑस्ट्रेलियाने 3 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला.

5 / 8

क्रिकबझ या वेबसाइटच्या राइज इंडिया शोमध्ये इशांत शर्माने म्हटले, 'माझा सर्वात वाईट टप्पा 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहालीमध्ये होता. त्या सामन्यात भारतीय संघाच्या पराभवाचे कारण मीच होतो. त्यावेळी मी माझ्या पत्नीला डेट करत होतो. मी तिच्याशी याबद्दल बोललो. मी जवळजवळ महिनाभर रडलो. मी तिला रोज फोन करायचो आणि रडत राहायचो.'

6 / 8

इशांत शर्मा ज्या सामन्याबद्दल भाष्य करत होता, त्या मालिकेत ऑस्ट्रेलियाची कमान जॉर्ज बेलीच्या हाती होती. भारतीय गोलंदाज पुढे म्हणाला, 'मला माहित नाही की माझ्यासाठी यापेक्षा वाईट काहीही असेल. पण एकाच षटकांत जास्त धावा दिल्याने मला दु:ख झाले नाही, पण पराभवाला मीच जबाबदार आहे याने दुखावलो गेलो.'

7 / 8

'चांगली गोष्ट म्हणजे माही भाई आणि शिखर धवन माझ्या खोलीत आले आणि त्यांनी मला आधार दिला आणि सांगितले की, तू चांगले करत आहेस. पण त्या एका सामन्यामुळे मी मर्यादित षटकांचा गोलंदाज नाही असा समज निर्माण झाला.'

8 / 8

इशांत शर्माने 80 वन डे सामन्यांमध्ये 115 बळी घेतले आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम गोलंदाजी 4/34 अशी होती. 105 कसोटी सामने खेळलेल्या इशांतने 311 बळी घेतले आहेत. त्याने 23 जानेवारी 2016 रोजी सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा वन डे सामना खेळला होता.

टॅग्स :इशांत शर्मामहेंद्रसिंग धोनीशिखर धवनभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाजेम्स फॉकनर
Open in App