भारत सातव्यांदा खेळणार वर्ल्डकपची सेमीफायनल, आधी सहावेळा अशी झाली होती कामगिरी

आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत मंगळवारी भारताची गाठ न्यूझीलंडशी पडणार आहे. विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याची भारताची ही सातवी वेळ आहे. आता या उपांत्य लढतीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान जाणून घेऊया आधीच्या सहा वेळा भारतीय संघाने कशी कामगिरी केली होती ते.

भारतीय संघाने 1983 च्या विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदा उपांत्य फेरी गाठली होती. त्यावेळी मोहिंदर अमरनाथ यांची अष्टपैलू कामगिरी आणि संदीप पाटील यांच्या झांझावाती खेळाच्या जोरावर भारताने इंग्लंडवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तसेच या स्पर्धेत भारताने पहिल्यावहिल्या विश्वचषक विजयाला गवसणी घातली होती.

1983 प्रमाणेच 1987 च्या विश्वचषकातही भारत आणि इंग्लंडचे संघ आमनेसामने आले होते. मात्र यावेळी इंग्लंडने बाजी मारत यजमान भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले होते.

1996 च्या विश्वचषकात यजमानपद भूषवताना भारतीय संघ पुन्हा एकदा उपांत्य फेरीत पोहोचला. मात्र सहयजमान असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या उपांत्य लढतीत आव्हानाचा पाठलाग करताना भारताची अवस्था 8 बाद 120 अशी केविलावणी झाली होती. त्यावेळी क्रिकेटप्रेमींनी दंगा सुरू केल्याने पंचांनी श्रीलंकेला विजयी घोषित केले होते.

2003 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषक स्पर्धेतही भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी केली होती. यावेळी केनियाविरुद्ध झालेल्या उपांत्य लढतीत कर्णधार सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांच्या दमदार खेळाच्या जोरावर भारताने विजय मिळवला होता. मात्र अंतिम लढतीत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला होता.

2011 मध्ये भारतात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत यजमानपद भूषवताना भारतीय संघाने जबरदस्त खेळ केला होता. या स्पर्धेच्या उपांत्य लढतीत भारतासमोर पाकिस्तानचे आव्हान होते. त्यावेळी भारताने पाकिस्तानवर मात करत उपांत्य फेरी गाठली होती. अखेर अंतिम लढतीत श्रीलंकेला नमवून विजेतेपदावरही कब्जा केला.

2015 च्या विश्वचषकातही भारताने सातत्यपूर्ण खेळ केला होता. मात्र यावेळी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात भारताला दारुण पराभव पत्करावा लागला होता.