ट्वेन्टी-२० वर्ल्डकपआधी भारतीय संघ 'खास प्लान'वर करतोय काम, रिषभ पंतचा खुलासा!

India vs West indies: रिषभ पंतला जेव्हा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकपबाबत विचारलं गेलं तेव्हा त्यानं एक महत्त्वाची गोष्ट उलगडून सांगितली आहे.

भारतीय संघानं नुकतीच वेस्ट इंडिज विरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतनं दमदार कामगिरी केली. यंदाच्या वर्षात ऑस्ट्रेलियामध्ये ट्वेन्टी-२० वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. याचबाबत रिषभ पंतला विचारण्यात आलं असता त्यानं केलेलं विधान अतिशय महत्वाचं ठरत आहे.

भारतीय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतनं दिलेल्या माहितीनुसार ८ महिन्यांनी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकपच्या दृष्टीनं भारतीय संघ सध्या विविध पर्याय आजमावून पाहत आहे. जास्तीत जास्त पर्याय आजमावून पाहण्याची योजना भारतीय संघ व्यवस्थापनाकडून तयार करण्यात आल्याचं पंतनं सांगितलं.

केएल राहुलच्या अनुपस्थितीत वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत रिषभ पंत भारतीय संघाचा उपकर्णधार म्हणून खेळत आहे. याच दरम्यान वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात पंतनं जबाबदारीनं फलंदाजी करत खणखणीत अर्धशतक साजरं केलं आणि संघासाठी मोलाचं योगदान दिलं. पंतला जेव्हा ट्वेन्टी-२० वर्ल्डकपबाबत विचारलं गेलं तेव्हा त्यानं यासाठी बराच कालावधी आमच्या हातात असल्याचं म्हटलं.

ट्वेन्टी-२० वर्ल्डकपला सामोरं जाण्याआधी आमच्या हातात बऱ्यापैकी वेळ आहे. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त पर्यायांचा वापर संघात करुन पाहात आहोत आणि अशीच आमची योजना आहे, असं पंतनं म्हटलं

रिषभ पंत वेस्ट इंडिज विरुद्धचा तिसरा ट्वेन्टी-२० सामना खेळणार नाहीय. कारण बीसीसीआयनं पंत आणि कोहलीला तिसऱ्या सामन्यासाठी आराम देत बायो-बबलमधूनही सूट देऊ केली आहे. आम्ही सध्या संघात प्रयोग करुन कोणत्या खेळाडूला कोणतं स्थान सुयोग्य आहे याची चाचपणी करत आहोत, असं पंत म्हणाला.

भारतीय संघासाठी जे उत्तम कॉम्बिनेशन असेल किंवा ठरेल त्यावरच काम केलं जाईल. त्यादृष्टीनेच संघात विविध पर्याय चाचपडून पाहिले जात आहेत. अखेरीस जे संघासाठी चांगलं असेल त्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असंही पंतनं म्हटलं.

वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनाही आराम देण्यात आला आहे. या दोघांच्या अनुपस्थितीत हर्षल पटेल भारतीय संघाकडून खेळत आहे. गेल्या सामन्यात अखेरच्या षटकात रोवमन पॉवेलकडून दोन षटकार पडलेले असतानाही हर्षल पटेल यानं हिंमत कायम ठेवत चांगली गोलंदाजी केली आणि संघाला विजय प्राप्त करुन दिला.

संघाच पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केल्यानं संघातील स्थान सुरक्षित होण्याबाबत विचारलं असता रिषभ पंत म्हणाला की, मी कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करावी हा संघाच्या योजनेचा भाग आहे. व्यक्तिगत खेळाडू म्हणून मी असा कधीच विचार करत नाही की कोणतं स्थान मला सुरक्षित ठेवू शकेल.