India vs South Africa: २० कसोटी सामन्यांमध्ये केवळ ३ विजय, असा आहे टीम इंडियाच्या २९ वर्षांतील ७ दक्षिण आफ्रिका दौऱ्यांचा इतिहास

India vs South Africa: भारतीय क्रिकेट संघ सध्या आपल्या आठव्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. २६ डिसेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांमध्ये आठवी कसोटी मालिका सुरू होणार आहे. भारतीय संघ १९९२ मध्ये दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा कसोटी मालिका खेळला होता. तेव्हापासून आतापर्यंत भारताने दक्षिण आफ्रिकेच्या सात दौऱ्यांमध्ये एकूण २० कसोटी सामने खेळले आहेत.

भारतीय क्रिकेट संघ सध्या आपल्या आठव्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. २६ डिसेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांमध्ये आठवी कसोटी मालिका सुरू होणार आहे. भारतीय संघ १९९२ मध्ये दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा कसोटी मालिका खेळला होता. तेव्हापासून आतापर्यंत भारताने दक्षिण आफ्रिकेच्या सात दौऱ्यांमध्ये एकूण २० कसोटी सामने खेळले आहेत. यामधील केवळ तीन कसोटी सामन्यांमध्ये भारताला विजय मिळाला आहे. तर १० सामन्यात भारतीय संघ पराभूत झाल आहे. उर्वरित सात सामने अनिर्णित राहिले आहेत.

दक्षिण आफ्रिकेच्या आतापर्यंतच्या सात दौऱ्यांमध्ये सहा कर्णधारांनी भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. यापैकी एकाही कर्णधाराला आफ्रिकेच्या भूमीत कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. मात्र तीन कर्णधारांना प्रत्येकी एक कसोटी जिंकण्यात यश मिळाले आहे.

भारताला दक्षिण आफ्रिकेत पहिला कसोटी सामना जिंकून देण्याचा मान राहुल द्रविडने मिळवला होता. द्रविडच्या नेतृत्वाखाली २००६ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघाने पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेला कसोटी सामन्यात पराभूत केले होते. या दौऱ्यामध्ये जोहार्न्सबर्ग येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताने दक्षिण आफ्रिकेवर १२३ धावांनी सनसनाटी विजय मिळवला होता.

त्यानंतर २०१० च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर मात केली. दर्बान येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने दक्षिण आफ्रिकेवर ८७ धावांनी विजय मिळवला होता. व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने पहिल्या डावात ३८ आणि दुसऱ्या डावात ९६ धावा करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती.

तर दक्षिण आफ्रिकेत भारताला तिसरा कसोटी विजय मिळवून देण्याचा मान विराट कोहलीने मिळवला. विराटच्या नेतृत्वाखाली २०१८ च्या दौऱ्यात जोहार्न्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत भारताने ६३ धावांनी विजय मिळवला होता. आता या दौऱ्यातही विराट कोहली भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. त्यामुळे या दौऱ्यात विराट कोहलीकडून कसोटीबरोबरच मालिका विजयाची अपेक्षा असेल.