IND vs ENG: कोहलीवर फॅन्स भडकले! म्हणाले रहाणेला कर्णधार करा नाहीतर...

India vs England Chennai Test : भारत विरुद्ध इंग्लंड चेन्नई कसोटीत (India vs England Chennai Test) भारताला २२५ धावांनी मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. भारतीय संघाच्या या पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीवर (Virat Kohli) जोरदार टीका केली जाऊ लागली आहे. नेटिझन्सचं काय म्हणणं आहे जाणून घेऊयात...

चेन्नईमध्ये इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली क्रिकेट चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे. नेटिझन्सनी ट्विटरवर कोहलीच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले आहेत आणि अजिंक्य रहाणेला संघाचा कर्णधार करण्याची मागणी केली आहे. (फाइल फोटो)

भारतीय संघाला कोहलीच्या नेतृत्त्वात सलग ४ कसोटी सामन्यांमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. गेल्यावर्षी भारतीय कसोटी संघाला न्यूझीलंड दौऱ्यात वेलिंग्टन आणि ख्राइस्टचर्च कसोटीत पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. यासोबतच भारतीय संघाला डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अॅडलेड कसोटीतही पराभव पत्करावा लागला होता. याही सामन्यात कोहली भारतीय संघाचा कर्णधार होता.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्या कसोटीनंतर कोहली पितृत्वाच्या रजेसाठी मायदेशी परतला. त्यानंतर अजिंक्य रहाणेने भारतीय संघाची धुरा सांभाळली आणि भारताला अभूतपूर्व यश प्राप्त करुन दिलं. रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघानं उर्वरित तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकले आणि मालिका खिशात टाकली.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ऐतिहासिक विजयानंतर अजिंक्य रहाणेला भारताच्या कसोटी संघाचं नेतृत्व दिलं जावं अशी मागणी केली जाऊ लागली. इंग्लंड विरुद्धच्या आजच्या पराभवानंतर आता कर्णधारपदाचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. क्रिकेट चाहत्यांनी रहाणेला भारतीय संघाचं नेतृत्व करू द्यावं, अशी मागणी लावून धरली आहे.

ट्विटरवर एका युझरनं कोहलीवर टीका करताना म्हटलं की, "कोहली इतका प्रभावशाली खेळाडू आहे की तो संघात नसताना ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतानं इतिहास रचला आणि जसा तो संघात परत आला तसं इंग्लंड विरुद्ध भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं", असं उपरोधिक ट्विट केलं आहे.

अजिंक्य रहाणे जर नेटमध्ये गोलंदाजी करणाऱ्यांना सोबत घेऊन ऑस्ट्रेलियाला पराभूत करू शकतो. तर विराट कोहली टॉप क्लास फलंदाज आणि गोलंदाजांनासोबत घेऊन इंग्लंडला मात देऊ शकला नाही. हे अजब आहे, असंही एका यूझरनं म्हटलं आहे.

एका यूझरनं तर कोहलीच्या आयपीएलमधील नेतृत्वाचाही संदर्भ येथे जोडला आहे. कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आयपीएलमध्ये सर्वात खालच्या क्रमांकावर असतो. तर एका यूझरनं दावा केला की, रहाणेनेला भारतीय संघाचं कर्णधार केलं नाही, तर इंग्लंड विरुद्ध भारताला व्हाइट वॉश मिळू शकतो.