रोहितने इंग्लंडविरुद्ध २००० आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पार केला. सचिन तेंडुलकर ( ३९९०) व विराट कोहली ( ३९७०) हे या विक्रमात पहिल्या दोन क्रमांकावर आहेत. महेंद्रसिंग धोनी, राहुल द्रविड, सुनील गावस्कर, मोहम्मद अझरुद्दीन, युवराज सिंग व दिलिप वेंगसरकर हे रोहितच्या पुढे आहेत.
रोहितने ४ संघांविरुद्ध प्रत्येकी २००० हून अधिक धावा केल्या आहेत आणि सुनील गावस्कर, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग यांच्याशी बरोबरी केली. सचिन ( ८), राहुल द्रविड ( ७) व विराट कोहली ( ६) हे आघाडीवर आहेत. कर्णधार म्हणून भारताकडून रोहितने ४५२७* धावा करून सचिनला ( ४५०८) मागे टाकले.
भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो चौथा फलंदाज ठरला. त्याने आज १८५७७ धावांचा टप्पा पार करून सौरव गांगुलीला ( १८५७५) मागे टाकले. सचिन ( ३४३५७), विराट ( २६७३३), राहुल ( २४२०८) हे रोहितच्या पुढे आहेत.
राजकोटमध्ये कसोटीत शतक झळकावणारा तो भारताचा तिसरा आणि एकूण चौथा सलामीवीर ठरला. पृथ्वी शॉ ( १३४ वि. वेस्ट इंडिज, २०१८), एलिस्टर कूक ( १३० वि. भारत, २०१६) व मुरली विजय ( १२६ वि. इंग्लंड, २०१६) यांनी इथे शतक झळकावले होते.
सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे त्याचे ४२वे शतक ठरले आणि त्याने ( ३३९) ख्रिस गेल ( ५०६) पेक्षा कमी इनिंग्जमध्ये हा पल्ला गाठला. सनथ जयसूर्याचा ४१ शतकांचा विक्रम मोडला.
३६ वर्ष व २९१ दिवसांचा असणारा रोहित हा कसोटीत शतक झळकावणारा भारताचा वयस्कर कर्णधार ठऱला. यापूर्वी हा विक्रम विजय हजारे ( ३६ वर्ष व २७८ दिवस) यांच्या नावांवर होता. १९५१ मध्ये त्यांनी इंग्लंडविरुद्ध हा पराक्रम केला होता.
रोहित व जडेजा यांनी चौथ्या विकेटसाठी २०४ धावांची भागीदारी करताना राजकोट येथील चौथ्या विकेटसाठी सर्वोत्तम भागीदारीचा विक्रम नोंदवला. २०१६ मध्ये मोईन अली व जो रूट यांनी भारताविरुद्ध १७९ धावांची भागीदारी केली होती.
IND vs ENG यांच्यातल्या भारतातल्या कसोटी सामन्यातील ही चौथ्या विकेटसाठी सर्वोत्तम भागीदारी ठरली. १९८५ मध्ये अमरनाथ व अझरुद्दीन यांनी चेन्नईत १९० धावा जोडल्या होत्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितने २१२ षटकार खेचून भारताकडून सर्वाधिक २११ षटकार मारणाऱ्या भारतीय कर्णधाराचा महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडला.