भारतात पहिलीच कसोटी खेळणाऱ्या ऑली स्टोन ( Olly Stone) यानं दुसऱ्याच षटकात टीम इंडियाला धक्का दिला. शुबमन गिल ( Shubman Gill) भोपळा न फोडताच माघारी परतला.
भारतीय संघानं आजच्या सामन्यासाठी जसप्रीत बुमराहला ( Jasprit Bumrah) आराम देण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या जागी मोहम्मद सिराजचे पुनरागमन झाले आहे. शाहबाज नदीम याला वगळून अक्षर पटेल ( Axar Patel) याला पदार्पणाची संधी दिली आहे.
आजच्या सामन्यातील तिसरा बदल हा अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारा आहे. ज्या खेळाडूनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ब्रिस्बेन कसोटीपासून संकटमोचकाची भूमिका पार पाडत आहे. वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sunder) याच्याबद्दल आपण बोलत आहोत.
वॉशिंग्टन सुंदर याला आजच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी कुलदीप यादवला ( Kuldeep Yadav) संधी मिळाली आहे. जवळपास दोन वर्षांनंतर कुलदीप कसोटी संघात पुनरागमन करत आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ब्रिस्बेन कसोटीत यजमानांनी ३६९ धावा केल्या होत्या. वॉशिंग्टननं पहिल्या डावात तीन विकेट्स घेतल्या होत्या. पण, टीम इंडियाचा डाव ६ बाद १८६ असा गडगडला. सुंदर आणि शार्दूल ठाकूर यांनी दमदार खेळ करताना संघाला ३३६ धावांपर्यंत मजल मारून दिली.
सुंदरनं या सामन्यात १४४ चेंडूंत ६२ धावाही केल्या. दुसऱ्या डावात त्यानं एक विकेटही घेतली आणि २९ चेंडूंत २२ धावा केल्या. या सामन्यात टीम इंडियानं ऐतिहासिक विजय मिळवला.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत सुंदरनं १३८ चेंडूंत नाबाद ८५ धावा करून संघाचा डोलारा सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्यानं या खेळीत १२ चौकार व २ षटकार खेचले.
टीम इंडिया ( Team India's playing XI for 2nd Test) : रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, रिषभ पंत, कुलदीप यादव, आर अश्विन, अक्षर पटेल, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज