India vs England 2nd Test : ३९ वर्ष, १४ दिवसांच्या जेम्स अँडरसननं नोंदवला ७० वर्षांच्या कसोटी इतिहासातील भारी विक्रम!

लॉर्ड्स कसोटीचा पहिला दिवस लोकेश राहुल व रोहित शर्मा यांनी गाजवताना इंग्लंडला बॅकफूटवर फेकले होते. पण, इंग्लंडनं दुसऱ्या दिवशी सॉलिड कमबॅक केला. जेम्स अँडरसननं पाच विकेट्स घेत लॉर्ड्सच्या बोर्डावर नाव कोरले. टीम इंडियाचे ८ फलंदाज ९७ धावांत माघारी परतले. 

पहिल्या दिवसाच्या ३ बाद २७६ धावांवरून टीम इंडियानं आज सुरुवात केली, पंरतु पहिल्याच सत्रात चार फलंदाज बाद झाले. जेम्स अँडरसननं ६२ धावांत पाच विकेट्स घेतल्या. मार्क वूड व ऑली रॉबिन्सन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. भारताचा पहिला डाव ३६४ धावांवर संपुष्टात आला.

अँडरसननं पहिल्या दिवशी रोहित शर्मा ( ८३) व चेतेश्वर पुजारा ( ९) यांची विकेट घेतली, अन् दुसऱ्या दिवशी त्यानं अजिंक्य रहाणे ( १), इशांत शर्मा ( ८) व जसप्रीत बुमराह ( ०) यांना बाद करून पाच विकेट्स पूर्ण केल्या. कसोटी क्रिकेटमधील त्यानं ३१व्यांदा एका डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.

कसोटी क्रिकेटच्या मागील ७० वर्षांच्या इतिहासात एका डावात प्रतिस्पर्धींचा निम्मा संघ बाद करणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. अँडरसन ३९ वर्ष व १४ दिवसांचा आहे. ( At 39 years and 14 days, Anderson's fourth five-for against India at Lord's made him the oldest pacer to take 5 wickets in a Test innings in the last 70 years.)

दक्षिण आफ्रिकेच्या जॉफ चूब यांनी १९५१च्या कसोटीत इंग्लंडविरुद्ध वय वर्ष ४० व ८६ दिवसांचा असताना मँचेस्टर येथे एका डावात पाच विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर अँडरसननं हा पराक्रम करून दाखवला.

अँडरसननं सर्वाधिक पाच विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये आर अश्विनसह संयुक्तपणे सहावे स्थान पटकावले. घरच्या मैदानांवर सर्वाधिक पाच विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांत पाचव्या क्रमांकावर आहे. मुथय्या मुरलीधरन ( ४५), रंगना हेरथ ( २६), अनील कुंबळे ( २५) , आर अश्विन ( २४) व जेम्स अँडरसन ( २३) असा क्रमांक येतो.