India Vs Bangladesh, Latest News : आजचा दिवस रोहितचाच, का ते जाणून घ्या...

या सामन्यातील शतकासह रोहितने यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावांचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहितच्या नावावर या विश्वचषकात सर्वाधिक 544 धावा झाल्या आहेत. हा अव्वल क्रमांक पटकावताना रोहितने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला पिछाडीवर टाकले आहे.

या सामन्यात पाच षटकार लगावत रोहित हा भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम धोनीच्या नावावर होता. धोनीने आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 238 षटकार लगावले होते. रोहितने हा विक्रम आता मोडीत काढला आहे.

या सामन्यात रोहितने चौथी धाव घेताच 2019 मध्ये वन डे क्रिकेटध्ये 1000 धावांचा पल्ला पार केला. यंदाच्या वर्षात त्याने 55 + च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. ॲरोन फिंच आणि उस्मान ख्वाजा यांच्या नंतर चालू वर्षात 1000 धावा करणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे.

एका विश्वचषकात शतक झळकावत रोहितने श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. संगकाराने 2015 साली झालेल्या विश्वचषकात चार शतके झळकावली होती. हा आतापर्यंत एका विश्वचषकातील सर्वाधिक शतकांचा विक्रम आहे. रोहितने या सामन्यात संगकाराच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

आतापर्यंत विश्वचषकात रोहितची पाच शतके झाली आहेत. या पाच शतकांसह रोहितने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीशी बरोबरी केली आहे. या यादीमध्ये भारताचा माजी माहन क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आघाडीवर आहे. सचिनच्या नावावर विश्वचषकात सहा शतके आहेत.