Join us  

India vs Australia : अजिंक्यसेनेने करून दाखवले! भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असे तिसऱ्यांदाच घडले

By बाळकृष्ण परब | Published: January 19, 2021 3:20 PM

Open in App
1 / 5

आज ब्रिस्बेन कसोटीच्या शेवटच्या दिवशी भारतीय संघाने ३२८ धावांचा यशस्वी पाठलाग करत एका ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. या विजयासह भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकून बॉर्डर-गावस्कर करंडक आपल्याकडे कायम राखला आहे.

2 / 5

आज भारतीय संघाने मिळवलेल्या सनसनाटी विजयासह भारतीय संघाने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. त्यातील विशेष विक्रम म्हणजे चौथ्या डावात ३०० हून अधिक धावांचा पाठलाग करून मिळवलेला विजय. आज भारतीय संघाने ३२८ धावांचा यशस्वी पाठलाग केला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असे केवळ तिसऱ्यांदाच घडले आहे.

3 / 5

यापूर्वी भारतीय संघाने १९७६ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या पोर्ट ऑफ स्पेन कसोटीत ४०३ धावांचा यशस्वी पाठलाग करताना चार गड्यांच्या मोबदल्यात ४०६ धावा बनवत विजय मिळवला होता. त्या सामन्यात सुनील गावस्कर आणि गुंडप्पा विश्वनाथ यांनी शतकी खेळी केली होती. तर मोहिंदर अमरनाथ यांनी ८५ धावांची खेळी केली होती.

4 / 5

त्यानंतर २००८ मध्ये भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध झालेल्या चेन्नई कसोटीत भारतीय संघाने ३८७ धावांचा पाठलाग यशस्वीरीत्या करून विजय मिळवला होता. त्या सामन्यात ३८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वीरेंद्र सेहवागने ८३ धावांची स्फोटक खेळी केली होती. त्यानंतर सचिन तेंडुलकरचे शतक आणि युवराज सिंहच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने सहा गडी राखून विजय मिळवला.

5 / 5

या दोन ऐतिहासिक विजयानंतर या जबरदस्त यशाची पुनरावृत्ती आज ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनच्या मैदानात झाली. पर्थनंतर ब्रिस्बेनमधील गॅबाची खेळपट्टी ही कठीण मानली जाते. याठिकाणी २३६ हा चौथ्या डावात झालेला हा सर्वात मोठा पाठलाग होता. मात्र भारतीय संघाने आज नवा इतिहास रचताना ३२८ धावांचे शिखर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा वेगवान तोफखाना निष्प्रभ ठरवत पार केले.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघआंतरराष्ट्रीय क्रिकेटअजिंक्य रहाणे