India vs Australia, 4th Test Day 4 : ब्रिस्बेन कसोटीच्या चौथ्या दिवशी खेळपट्टीनं तिचा रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. अनपेक्षित उसळी घेणाऱ्या चेंडूंचा सामना करताना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना चाचपडावे लागत आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर पाचव्या दिवशी फलंदाजी करणे तितकं सोपं नसेल, याचा अंदाज टीम इंडियाला आलाच असेल.
मोहम्मद सिराजनं टाकलेल्या अशाच एका अनपेक्षित चेंडूवर स्टीव्ह स्मिथ ( Steve Smith) बाद झाला. गल्लीमध्ये उभ्या असलेल्या अजिंक्य रहाणेनं त्याचा झेल टिपला. पण, क्लिअर कट बाद असूनही स्मिथनं DRS घेतला. त्याच्या या कृतीवर नेटिझन्स भडकले. पहिल्या सत्रात डेव्हिड वॉर्नर यानंही 15 सेकंदाची वेळ संपल्यानंतर DRS घेतला आणि अम्पायरने तो मान्यही केला.
चौथ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला चार धक्के दिले. शार्दूल व वॉशिंग्टन यांनी सलामीवीरांना माघारी पाठवल्यानंतर मोहम्मद सिराजनं एकाच षटकात दोन फलंदाज बाद केले. २५व्या षटकात शार्दूलनं टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिलं. मार्कस हॅरीसला ( ३८) त्यानं बाद केलं.
पुढच्याच षटकात वॉशिंग्टननं डेव्हिड वॉर्नरला ( ४८) पायचीत केलं. नॉन स्ट्रायकर एंडला असलेल्या लाबुशेनचं ऐकून वॉर्नरनं DRS घेतला. त्यासाठीची १५ सेकंदाची वेळही संपून गेली होती, परंतु त्याचा हा DRS अपयशी ठरला आणि त्याला माघारी जावं लागलं.
स्टीव्ह स्मिथ व मार्नस लाबुशेन आक्रमक खेळ करताना दिसले आणि अजिंक्य रहाणेनं त्यांना रोखण्यासाठी मोहम्मद सिराजला पुन्हा गोलंदाजीला बोलावले. अजिंक्यची ही चाल यशस्वी ठरली आणि सिराजनं एकाच षटकात लाबुशेन ( २५) व मॅथ्यू वेड ( ०) यांना माघारी पाठवले.
स्टीव्ह स्मिथनं आक्रमक खेळ करताना अर्धशतक पूर्ण केलं. तत्पूर्वी वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर सिराजनं स्मिथचा झेल सोडला. पण, याची भरपाई त्यानं केली. अप्रतिम चेंडू टाकून स्मिथला त्यानं माघारी जाण्यास भाग पाडले. अनपेक्षित उसळी घेणारा चेंडू स्मिथच्या अंगठ्याला लागला आणि अजिंक्यनं तो झेल टिपला. पण, स्मिथच्या मते चेंडू अंगठ्याला लागला तेव्हा त्याचा हात बॅटला टच नव्हता. त्यामुळे त्यानं तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली. त्याचा काही उपयोग झाला नाही आणि त्याला ५५ धावांवर माघारी जावे लागले.
यानंतर शार्दूल ठाकूरनं ऑसींना धक्का दिला. कॅमेरून ग्रीन ( ३७) ठाकूरच्या गोलंदाजीवर रोहित शर्माच्या हाती झेल देऊन माघारी परतला. या सामन्यातील शार्दूलची ही पाचवी विकेट, तर रोहित शर्माची पाचवी कॅच ठरली. या हाय फाईव्ह कामगिरीमुळे रोहितच्या नावावर विक्रमाची नोंद झाली.
कृष्णमचारी श्रीकांत यांच्यानंतर ऑस्ट्रेलियात एकाच कसोटी सामन्यात पाच झेल टिपणारा रोहित हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला.
ब्रिस्बेन कसोटीत पाच झेल घेणारा तिसरा खेळाडू आहे. यापूर्वी सॅम लॉक्सटन यांनी १९५०मध्ये आणि मार्क टेलरने १९९७मध्ये ब्रिस्बेन कसोटीत पाच झेल टिपले होते. १९९७मध्ये स्टीफन फ्लेमिंगनं टिपलेल्या ६ झेलचा विक्रम अजूनही मोडला गेला नाही.