भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला तिसरा व अखेरचा वन डे सामना बुधवारी कॅनबेरा येथे होणार आहे. पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवून ऑस्ट्रेलियानं मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे टीम इंडियाला इभ्रत वाचवण्यासाठी तिसरा सामना जिंकावा लागेल.
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत मयांक अग्रवालनं सलामीला शिखर धवनला साथ दिली, परंतु त्याला मोठी खेळी करता आलेली नाही. त्याच्या अपयशामुळे मधल्या फळीतील फलंदाजांवर प्रचंड दडपण वाढलेले पाहायला मिळाले.
गोलंदाजांनाही साजेशी कामगिरी करता आलेले नाही. त्यामुळे तिसऱ्या वन डेत भारतीय संघात तीन बदल करण्याचा विचार कर्णधार विराट कोहलीच्या डोक्यात सुरु आहे.
लोकेश राहुलकडे सलामीची जबाबदारी सोपवल्यास मयांकला संघाबाहेर केले जाऊ शकते आणि त्याच्या जागी मनिष पांडेला अंतिम अकरामध्ये प्रवेश मिळू शकतो.
सहावा गोलंदाजाचा पर्याय म्हणून शार्दूल ठाकूरचा विचार होऊ शकतो. शार्दूल फलंदाजीतही आपली कमाल दाखवू शकतो. भारतीय संघाला पॉवर प्लेमध्ये विकेट घेता आलेली नाही. त्यात दीर्घ दौरा लक्षात घेता जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाऊ शकते.
युजवेद्र चहल पहिल्या दोन सामन्यात महागडा ठरला. त्यामुळे त्याच्या जागी कुलदीप यादवला संधी मिळू शकते. नवदीप सैनीच्या जागी टी नटराजन टीम इंडियाकडून पदार्पण करू शकतो.
असा असेल टीम इंडियाचा अंतिम संघ - शिखर धवन, लोकेश राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह/मोहम्मद शमी, कुलदीप यादव, नवदीप सैनी, टी नटराजन