Ind vs Aus 2nd test live : आर अश्विनचा 'अष्टपैलू' पराक्रम! पाच भारतीयांना जमलाय हा विक्रम; अक्षर पटेलसह सावरला डाव

India vs Australia 2nd test live score updates : ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लियॉनने ( Nathan Lyon) भारताला पाच धक्के देत बॅकफूटवर फेकले. विराट कोहली व रवींद्र जडेजा यांनी भारताचा डाव सावरताना १२९ चेंडूंत ५९ धावांची भागीदारी केली. पण, विराटच्या विकेटवरून वादाची फोडणी मिळाली.

विराटच्या विकेटनंतर ऑस्ट्रेलियाला सामन्यात पकड घेण्याचे स्वप्न पडले, परंतु आर अश्विन व अक्षर पटेल या जोडीने त्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला. स्लीपमध्ये सोडलेले झेल ऑस्ट्रेलियाला महागात पडले. अश्विन व पटेल यांनी भारताच्या डावातील सर्वोत्तम भागीदारीची नोंद केली. दरम्यान, अश्विनने मोठ्या पराक्रमाची नोंद केली. Ind vs aus test

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २६३ धावा केल्या. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज नॅथन लियॉनने दबदबा राखला. दोन DRS वाया घालवल्यानंतर अखेर लियॉनला लोकेश राहुलची ( १७) विकेट मिळवण्यात यश आले.

१००वी कसोटी खेळणारा चेतेश्वर पुजारा ( ०) लियॉनच्या गोलंदाजीवर LBW झाला. लियॉनने पुढच्याच षटकात रोहितचा ( ३२) त्रिफळा उडवला. लियॉनने श्रेयस अय्यरलाही ( ४) हँड्सकोम्बकरवी झेलबाद केले. भारताची अवस्था बिनबाद ४६ वरून ४ बाद ६६ अशी केली.

विराट कोहली व रवींद्र जडेजा यांनी भारताचा डाव सावरताना १२९ चेंडूंत ५९ धावांची भागीदारी केली. पहिल्या कसोटीत ७ विकेट्स घेणाऱ्या टॉड मर्फीनं ही जोडी तोडली. रवींद्र जडेजा ७४ चेंडूंत २६ धावांवर पायचीत झाला. कुहनेमनने टाकलेल्या चेंडूवर विराटला पायचीत दिले गेले.

विराटने लगेच DRS घेतला. त्यात चेंडू बॅट व पॅड यांना एकाच वेळी टच होत असल्याचे दिसले अन् Umpire Call मुळे विराटला बाद दिले गेले. विराट ४४ धावांवर बाद झाला, पण तो व संघ व्यवस्थापन या निर्णयावर नाराज दिसले.

केएस भरतला आज संधी होती, परंतु स्वीप शॉट मारण्याच्या प्रयत्नात तो ६ धावांवर बाद झाला. लियॉनची ही डावातील पाचवी विकेट आणि भारताविरुद्धची १०० वी विकेट ठरली. भारताविरुद्ध कसोटीत शंभर विकेट घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. जेम्स अँडरसन ( १३ ९) व मुथय्या मुरलीधरन ( १०५) यांनी हा पराक्रम आधी केला आहे.

अक्षर पटेल व अश्विन यांनी पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी वाढवली. दोघांनी १३९ चेंडूंत ८३ धावांची भागीदारी करताना भारताला ७ बाद २२२ धावांपर्यंत पोहोचवले आहे. अश्विनने या खेळीत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५०००+ धावांचा पल्ला ओलांडला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५०००+धावा आणि ७००+ विकेट्स घेणारा तो भारताचा पाचवा खेळाडू ठरला.