IND vs ZIM 1st ODI Live : टीम इंडियाकडून ओपनिंगला कोण येणार?, BCCI च्या ट्विटने वाढवला गोंधळ, २ वेगवेगळ्या जोडींची नावं समोर

India vs Zimbabwe 1st ODI Live : भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या वन डे मालिकेतील पहिला सामना सुरू झाला आहे. कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

India vs Zimbabwe 1st ODI Live : भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या वन डे मालिकेतील पहिला सामना सुरू झाला आहे. कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लोकेशसह गोलंदाज दीपक चहर यांचे पुनरागमन हा सर्वांच्या चर्चेचा विषय आहे. पहिल्याच वन डे सामन्यात वेगळाच गोंधळ सुरू झाला आहे. BCCI ने टीम लिस्ट जाहीर केली अन् त्यावरून नक्की आजच्या सामन्यात ओपनिंग कोण करणार हा वाद सुरू झाला आहे. हरारे येथे देण्यात आलेल्या टीम लिस्टमध्ये वेगळीच जोडी ओपनिंगला येणार असल्याचे दिसत आहे.

भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या क्रिकेट सामन्यात टीम इंडियाचे पारडे नेहमी जड राहिलेले आहे. पण, झिम्बाब्वेनेही अधुनमधून भारताला धक्के दिले आहेत. कसोटीत भारतीय संघ दोनवेळा झिम्बाब्वेकडून पराभूत झाला आहे. वन डेत १०, तर ट्वेंटी-२०त २ विजय मिळवून झिम्बाब्वेने भारतीय चाहत्यांना धक्का दिला होता. पण, एकंदर आकडेवारी पाहता भारताने ८२ पैकी ६३ आंतरराष्ट्रीय सामने जिंकलेले आहेत.

आयपीएल २०२२नंतर लोकेश एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. चार महिने तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे आणि जूनमध्ये जर्मनीत त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. जुलैपासून त्याने सरावाला सुरुवात केली. त्यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी त्याला कोरोनाची लागण झाली आणि त्याच्या तंदुरुस्तीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. पण, फिटनेस टेस्ट पास करून तो झिम्बाब्वे दौऱ्यातून पुनरागमन करत आहे.

इशान किशन, संजू सॅमसन यांचेही पुनरागमन चाहत्यांना सुखावणारे आहे. ऋतुराज गायकवाडला अजूनही बाकावर बसवून ठेवण्यात आले आहे. दीपक चहरही आयपीएल २०२२पूर्वीच दुखापतग्रस्त झाला होता आणि इतक्या महिन्यांनी तोही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करतोय.

आजच्या सामन्यासाठी BCCI ने जाहीर केलेल्या लिस्टमध्ये लोकेश राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), शुबमन गिल, इशान किशन, दीपक हुड्डा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, दीपक चाहर, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज अशी क्रमवारी आहे. त्यानुसार लोकेश व धवन ओपनिंगला येतील असा अंदाज व्यक्त केला जात होता.

पण, प्रत्यक्षात हरारे येथून आलेल्या टीम लिस्टमध्ये शुबमन गिल व शिखर धवन ही जोडी सलामीला येणार असल्याचे दिसतेय. या सामन्याचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या SONY नेही गिल व धवन ही जोडी ओपनिंगला येईल असे दाखवले आहे. लोकेश राहुल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल.