"राजस्थान रॉयल्समुळे आर्थिक सहाय्य मिळालं अन्...", जैस्वालने सांगितला 'संघर्षमय' प्रवास

आपल्या अप्रतिम खेळीच्या जोरावर यशस्वी जैस्वालने भारतीय संघात स्थान मिळवले आहे.

आयपीएल २०२३ ने भारतीय क्रिकेटला अनेक युवा शिलेदार दिले, ज्यांच्यामध्ये भविष्यात देशाचे प्रतिनिधित्व करण्याची क्षमता आहे. यातीलच प्रमुख नाव म्हणजे राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल.

आपल्या अप्रतिम खेळीच्या जोरावर यशस्वीने भारतीय संघात स्थान मिळवले आहे. याचे सर्व श्रेय तो त्याची आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सला देतो. इंडियन एक्‍सप्रेसच्या आयडिया एक्‍सचेंज या कार्यक्रमात त्याने विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

आपली संघर्षगाथा सांगताना यशस्वीने सांगितले की, मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरचे लाइट्स मी जेव्हा पाहायचो तेव्हा मला वाटायचे की, एक दिवस मी तिथेही खेळेन. हा विचार नेहमी माझ्या मनात होता.

"वानखेडे स्टेडियममध्ये खेळण्याचा विचार नेहमी माझ्या मनात असायचा. पण जेव्हा मी तिथे खेळलो अन् शतक झळकावले तेव्हा बालपणीच्या आठवणी जिवंत झाल्या. त्यामुळे मला आणखी चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते. मी वानखेडेवर खेळणार की नाही याचा विचारच केला नव्हता. पण एक दिवस मी तिथे पोहोचेन हे समजून सराव करत राहिलो", असे त्याने नमूद केले.

यशस्वी जैस्वालला रेड बॉल क्रिकेट खेळणे खूप आवडते. "मी रेड बॉल क्रिकेटचा पुरेपूर आनंद घेतो. हा मुंबई क्रिकेटचा वारसा आहे, मग ते शालेय क्रिकेट असो किंवा क्लब क्रिकेट, सामने तीन, चार किंवा पाच दिवस चालतात. या सामन्यांमध्ये खेळाडू खूप धावा करतात", अशा शब्दांत जैस्वालने त्याच्या आठवणींना उजाळा दिला.

यशस्वीला हॉलिवूड अभिनेत्री केट विन्सलेटचा अभिनय आवडतो. टायटॅनिक चित्रपटातील प्रसिद्ध गाण्याबाबत तो म्हणाला, "या गाण्यात एक ओळ आहे, 'एव्हरी नाईट इन माय माइंड... जेव्हा मला काही साध्य करायचे असते तेव्हा मी या ओळींचा विचार करतो."

तसेच राजस्थान रॉयल्सच्या फ्रँचायझीमुळे मला खूप आर्थिक सहाय्य झाले असल्याचे जैस्वाल सांगतो. "माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रिकेट. मला वाटते की याबाबतीत मला राजस्थान रॉयल्सकडून खूप पाठिंबा मिळाला आहे. या फ्रँचायझीमुळे मला खूप आर्थिक मदत मिळाली", असे त्याने सांगितले.

राजस्थानच्या फ्रँचायझीने माझ्या आर्थिक गोष्टींची काळजी घेतली, जेणेकरून मी माझ्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करू शकेन. मी खरोखर कृतज्ञ आहे आणि त्यांच्या खेळाडूंसाठी असे करत असलेल्या सर्व फ्रँचायझींबद्दल मला खूप आदर असल्याचे जैस्वाल सांगतो.

आयपीएलचा सोळावा हंगाम यशस्वी जैस्वालसाठी खास राहिला. त्याने १६३.६१ च्या सरासरीनुसार ६२५ धावा केल्या असून यामध्ये एका शतकी खेळीचा देखील समावेश आहे.

आयपीएलमधील शानदार कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय संघात जागा मिळवली. अलीकडेच पार पडलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तो भारतीय संघासोबत इंग्लंडला गेला होता. राखीव खेळाडू म्हणून त्याला संघासोबत जाण्याची संधी मिळाली होती.

आता पुढच्या महिन्यात तो भारतीय संघासोबत वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. वन डे आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. जैस्वालला आगामी कसोटी मालिकेसाठी संघात स्थान मिळाले आहे.