रिंकू सिंग ते ऋतुराज गायकवाड; ७ आयपीएल स्टार ज्यांना मिळालं नाही ट्वेंटी-२० संघात स्थान

IND vs WI T20I Series : भारतीय संघ कॅरेबियन दौऱ्यावर दोन वेळच्या विश्वविजेत्या वेस्ट इंडिजविरुद्ध पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. निवड समितीचे नवीन प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली या मालिकेसाठी युवा खेळाडूंचा ट्वेंटी-२० संघ जाहीर केला गेला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ही मालिका खेळणार आहे आणि यात अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्याचा धाडसी निर्णय घेतला गेला आहे. पण, १५ सदस्यीय संघात आयपीएल २०२३ गाजवणाऱ्या ७ खेळाडूंकडे दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळतेय...

रिंकू सिंग - इंडियन प्रीमिअर लीग २०२३ गाजवली ती कोलकाता नाइट रायडर्सच्या या मॅच फिनिशरने... ट्वेंटी-२० वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून भारतीय संघ युवा खेळाडूंना संधी देईल अशी शक्यता वर्तवली गेली होती आणि रिंकूचे नाव आघाडीवर होते. २५ वर्षीय फलंदाजाने आयपीएल २०२३ मध्ये १४ सामन्यांत ४७४ धावा चोपून सर्वांना इम्प्रेस केलं होतं. एकहाती सामना फिरवण्याची धमक या खेळाडूमध्ये आहे.

ऋतुराज गायकवाड - वेस्ट इंडिज दौऱ्यावरील वन डे व कसोटी संघाचा सदस्य असलेल्या ऋतुराज गायकवाडला मात्र ट्वेंटी-२० संघातून वगळण्यात आले. आयपीएल २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या या सलामीवीराने १६ सामन्यांत ५९० धावा चोपल्या होत्या. २६ वर्षीय सलामीवीर भारताला चांगली सुरुवात करून देण्याची ताकद राखतो. भारताकडून आतापर्यंत त्याने ९ ट्वेंटी-२० सामन्यात त्याने १३५ धावा केल्या आहेत. बॅक अप ओपनर म्हणून त्याचा विचार केला जाऊ शकत होता.

जितेश शर्मा - पंजाब किंग्सचा यष्टिरक्षक-फलंदाज जितेश शर्मा हा श्रीलंका व न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतील भारतीय संघाचा सदस्य होता, परंतु त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळाली नाही. पण, आयपीएल २०२३ मध्ये त्याने दमदार कामगिरी करताना भारतीय संघाचे दार पुन्हा ठोठापले होते.

मोहित शर्मा - आयपीएल २०२३ ही मोहित शर्माच्या पुनरागमनाने चर्चेत राहिली. ऐकेकाही चेन्नईचा मुख्य गोलंदाज असलेल्या मोहितला गुजरात टायटन्ससाठी नेट बॉलर म्हणून राहावे लागले. पण, आयपीएल २०२३ मध्ये हार्दिक पांड्याने ३४ वर्षीय गोलंदाजाला संधी दिली आणि त्याने १४ सामन्यांत २७ विकेट्स घेत कमाल केली. ट्वेंटी-२० संघात मोहितचा अनुभवी गोलंदाज म्हणून सहभाग करून घेता आला असता.

वरुण चक्रवर्थी - कोलकाता नाइट रायडर्सच्या या गोलंदाजाने यंदाचे आयपीएल पर्व गाजवले होते. त्याने १४ सामन्यांत २० विकेट्स घेतल्या होत्या, परंतु भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी ही कामगिरी पुरेशी ठरली नाही.

शिवम दुबे - चेन्नई सुपर किंग्सच्या या स्फोटक फलंदाजाने संधी दिल्यास आपण काय करून दाखवू शकतो याची प्रचिती आयपीएलच्या यंदाच्या पर्वात घडवली. ३० वर्षीय अष्टपैलू खेळाडूने भारताकडून १३ सामने खेळले आहेत. आयपीएल २०२३ मध्ये त्यने १६ सामन्यांत १५८.३३ च्या स्ट्राईक रेटने ४१८ धावा केल्या आहेत.

विराट कोहली - वर्क लोड मॅनेजमेंट म्हणून निवड समितीने विराट कोहलीला विश्रांती दिली आहे. १० नोव्हेंबर २०२२ पासून तो भारताकडून ट्वेंटी-२० सामना खेळलेलाच नाही. पण, आयपीएल २०२३ मध्ये त्याने १४ सामन्यांत ६३९ धावा चोपून टीकाकारांना गप्प केले होते. त्याने दोन शतकं व ६ अर्धशतकं झळकावली होती.