'लाडक्या'ला संधी द्यायची की अक्षरला? रोहितसमोर Playing XI साठी पेच; कुलचा एकत्रित खेळणं अवघड

IND vs WI ODI Playing XI : कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ आता वन डे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका भारतासाठी महत्त्वाची आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघ फार कमी वन डे सामने खेळणार आहे आणि त्यातूनच वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ निवड होणार आहे.

२७ जुलैपासून भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या तीन सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होतेय. त्यामुळे पहिल्या वन डे सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळते याची उत्सुकता आहे. अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि संजू सॅमसन यांच्या निवडीवरून रोहित शर्माची डोकेदुखी वाढणार हे नक्की आहे.

इशान किशनने विंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत पदार्पण केले आणि दुसऱ्या कसोटीत अर्धशतक झळकावले होते. वन डे मालिकेत इशान की संजू सॅमसन यांच्यापैकी कोणाला संधी मिळते याची उत्सुकता आहे. त्यात अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्यात शर्यत आहेच.

रोहित शर्मा व शुबमन गिल ही सलामीची जोडी कायम राहणार हे नक्की आहे. कसोटीप्रमाणे शुबमनला तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्याची शक्यता कमीच आहे. विराट कोहली त्या क्रमांकावर आहेच. सूर्यकुमार यादव चौथ्या स्थानी फलंदाजीला आहे. पण, वर्ल्ड कप स्पर्धेत श्रेयस अय्यर फिट असल्यास खेळण्याची शक्यता आहे.

इशानने कसोटीत केएस भारतची संधी हिरावून घेतली, परंतु वन डेत संजूला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. इशान किशनला संधी दिली जाईल. वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत सर्वांना संधी मिळावी, हा त्यामागचा उद्देश आहे. लोकेश राहुल तंदुरुस्त झाल्यास वर्ल्ड कप स्पर्धेत तो यष्टिंमागे दिसू शकतो.

हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा हे अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावतील. आणखी एक अष्टपैलू म्हणून अक्षर पटेल आणि रोहितचा फेव्हरिट शार्दूल ठाकूर यांच्यात चढाओढ असेल. मोहम्मद सिराजच्या खांद्यावर गोलंदाजीचे नेतृत्व असेल. उम्रान मलिक व हार्दिक हे त्याच्या मदतीला आहेतच. चौथा जलदगती गोलंदाज म्हणून शार्दूलची निवड होऊ शकते. अशात कुलदीप यादव किंवा युझवेंद्र चहल यांच्यापैकी एकाचीच निवड होईल

अशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल/शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, उम्रान मलिक.