कोहलीची 'विराट' कामगिरी! वीरूचा मोठा रेकॉर्ड मोडला; फक्त १८५ व्या डावात 'गड केला सर'

Virat Kohli Breaks Virender Sehwag Records : भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे.

भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. सध्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील सलामीचा सामना सध्या पार पडत असून भारत मजबूत स्थितीत आहे.

पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाअखेर विराट कोहली ३६ धावांवर नाबाद आहे. यादरम्यान त्याने एका नवीन विक्रमाला गवसणी घातली आहे. विराटने कसोटी क्रिकेटमध्ये ८५०० धावा पूर्ण केल्या असून माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचा मोठा विक्रम मोडित काढला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये ८ हजार किंवा त्याहून अधिक धावा करणाऱ्या भारतीयांच्या यादीत विराट कोहली पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर वीरेंद्र सेहवागची सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

विराटला ८५०० धावांचा आकडा गाठण्यासाठी २१ धावांची गरज होती. त्याने पहिल्या सामन्यातील भारताच्या डावाच्या १०३व्या षटकात एक धाव काढून हा आकडा गाठला.

इनिंगच्या बाबतीत पाहिले तर सर्वाधिक वेगाने इथपर्यंत पोहचणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. विराटने केवळ १८५ डावांमध्ये ही किमया साधली.

विराट कोहलीच्या नावावर आताच्या घडीला कसोटीत ८५१५ धावांची नोंद आहे, तर सेहवागच्या ८५०३ धावा आहेत. भारतासाठी कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.

सचिनने २०० कसोटी सामन्यांमध्ये १५९२१ धावा केल्या आहेत. सचिनने ५१ शतके आणि ६८ अर्धशतके झळकावली आहेत. तो ३२९ डावांमध्ये ३३ वेळा नाबाद राहिला आहे. तर त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही नाबाद २४८ होती.

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारतीय संघाचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड आहेत. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये १३२६५ धावा केल्या आहेत, तर सुनील गावस्कर १०१२२ धावांसह तिसऱ्या आणि व्हीव्हीएस लक्ष्मण ८७८१ धावा करून चौथ्या स्थानावर आहेत.

विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७५ शतके झळकावली आहेत. सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके ठोकण्याच्या बाबतीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा फलंदाज जो रूट आहे, ज्याने आतापर्यंत ४६ शतके झळकावली आहेत.