दबक्या पावलांनी आला अन्...! यशस्वी जैस्वालने रोहितसह मोडले ९ मोठे विक्रम, १९३६नंतर घडला पराक्रम

IND vs WI 1st Test Live updates Marathi : भारतीय संघाने WTC 2023-25 हंगामातील पहिल्याच कसोटीत वेस्ट इंडिजवर वर्चस्व गाजवले. विंडीजच्या १५० धावांच्या प्रत्युत्तरात यशस्वी जैस्वाल ( ११६*) व रोहित शर्मा ( १०३) यांनी २२९ धावांची भागीदारी करून विक्रमांचे इमले रचले. या दोघांनी शतक झळकावताना मोठ मोठे विक्रम तोडले.

रोहित शर्मा आणि यशस्वी ही ओपनिंग जोडी वेस्ट इंडिजविरुद्ध वेस्ट इंडिजमध्ये १७ वर्षानंतर शतकी भागीदारी करणारी पहिली भारतीय जोडी ठरली. यापूर्वी २००६ मध्ये वसीम जाफर व वीरेंद्र सेहवाग यांनी हा पराक्रम केला होता. यशस्वी-रोहितने १६०वी धाव घेताच मोठा विक्रम नोंदवला गेला. वेस्ट इंडिजमध्ये १७ वर्षानंतर भारताकडून झालेली ही सलामीवीरांची सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी २००६मध्ये वीरेंद्र सेहवाग व वसीम जाफर यांनी सेंट ल्युसिया येथे १५९ धावांची सलामी दिली होती.

वेस्ट इंडिजमध्ये कसोटीत शतकी भागीदारी करणाऱ्या ४ सलामीच्या जोड्या आहेत आणि त्याता रोहित-यशस्वीचा समावेश झालाय. १९७१ मध्ये गावस्कर/अशोक मंकड, १९७६ मध्ये गावस्कर/अंषुमन गायकवाड, २००६ मध्ये सेहवाग/जाफर ( दोन वेळा) यांनी असा पराक्रम केला होता

भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक ५०+ धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहित शर्मा ( १०२*) दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. सचिन तेंडुलकर ( १२०) आघाडीवर आहे, तर सुनील गावस्कर आणि वीरेंद्र सेहवाग ( १०१) तिसऱ्या क्रमांकावर आहेत. भारताबाहेर रोहितने ५९ वेळा ५०+ धावा करून सौरव गांगुलीच्या विक्रमाशी बरोबरी केली. सचिन तेंडुलकर ( ९६), विराट कोहली ( ८७) आणि राहुल द्रविड ( ८७) हे आघाडीवर आहेत.

यशस्वीने आज ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. परदेशात किंवा तटस्थ ठिकाणी भारतीय सलामीवीराने पदार्पणात सर्वोत्तम खेळीचा विक्रम यशस्वीने नावावर केला. त्याने सुधिर नाईक यांचा ७७ ( वि. इंग्लंड, १९७४) विक्रम मोडला. या विक्रमात मयांक अग्रवाल ( ७६ वि. ऑस्टेलिया, २०१८), सुनील गावस्कर ( ६७* वि. वेस्ट इंडिज, १९७१) यांचा विक्रम मोडला. यशस्वीने पदार्पणात शतक झळकावले आणि शिखर धवन व पृथ्वी शॉ यांच्यानंतर कसोटीत शतक झळकावणारा तो तिसरा भारतीय ठरला. त्याने २१५ चेंडूंत ११ चौकारांसह शतक पूर्ण केले.

यशस्वीपाठोपाठ रोहितनेही कसोटीतील १०वे शतक झळकावले. रोहित-यशस्वीची २२९ धावांची भागीदारी ही भारतीय सलामीवीरांनी आशिया खंडाबाहेरील केलेली सर्वोत्तम ठरली. १९७९ मध्ये चेतन चौहान व सुनील गावस्कर यांनी इंग्लंडविरुद्ध २१३ धावा, तर १९३६ मध्ये विजय मर्चंट व मुश्ताक अली यांनी इंग्लंडविरुद्ध २०३ धावा जोडल्या होत्या. रोहित २२१ चेंडूंत १०३ धावांवर झेलबाद झाला अन् २२९ धावांवर भारताला पहिला धक्का बसला.

वेस्ट इंडिजमध्ये २००+ धावांची भागीदारी करणारी ही भारताची पहिली सलामीवीरांची जोडी ठरली. आतापर्यंत भारताच्या ७ जोडींनी वेस्ट इंडिजमध्ये २००+ धावांची भागीदारी केली आहे. कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा यशस्वी हा १७वा भारतीय, तिसरा सलामीवीर आणि सहावा डावखुरा फलंदाज ठला आहे.

कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा यशस्वी चौथा युवा ( २१ वर्ष व १९६ दिवस) भारतीय फलंदाज ठरला. या विक्रमात पृथ्वी शॉ ( १८ वर्ष व ३२९ दिवस), अब्बास अली ( २० वर्ष ल १२६ दिवस) व गुंडप्पा विश्वनाथ ( २० वर्ष व २७६ दिवस) हे आघाडीवर आहेत. पण, भारताबाहेर शतक झळकावणारा तिसरा युवा फलंदाज ठरला. माधव आपटे ( २० वर्ष व १३७ दिवस वि. वेस्ट इंडिज, १९५३) आणि रवी शास्त्री ( २० वर्ष व २४८ दिवस वि. पाकिस्तान, १९८३) हे आघाडीवर आहेत.

कसोटीच्या एकाच डावात दोन्ही सलामीवीरांनी शतक झळकावल्याची ही सहावी जोडी आहे. यापूर्वी विजय मर्चंट/मुश्ताक अली ( वि. इंग्लंड, १९३६), सुनील गावस्कर/श्रीकांत ( वि. ऑस्ट्रेलिया, १९८५-८६), वीरेंद्र सेहवाग/राहुल द्रविड ( वि. पाकिस्तान, २००६), वसीम जाफर/दिनेश कार्तिक ( वि. बांगलादेश, २००७), मुरली विजय/शिखर धवन( वि. बांगलादेश, २०१५) यांनी हा पराक्रम केलाय.

आशिया खंडाबाहेर दोन्ही सलामीवीरांनी एकाच डावात शतक झळकावण्याची ही भारताची तिसरी जोडी ठरली. विजय मर्चंट ( ११४)/मुश्ताक अली ( ११२) ( वि. इंग्लंड, १९३६), सुनील गावस्कर( १७२) /श्रीकांत ( ११६) ( वि. ऑस्ट्रेलिया, १९८५-८६) आणि जैस्वाल ( ११६*) आणि रोहित शर्मा ( १०३) यांनी असा पराक्रम केलाय.