IND vs SL, 3rd T20I Live Update : Shreyas Iyer २०४ धावांवर नाबाद राहिला, विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला; भारत पुन्हा पाकिस्तानवर भारी पडला

India vs Sri Lanka, 3rd T20I Live Update : रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघाने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवण्याची मालिका कायम राखली आहे. न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांना ट्वेंटी-२० मालिकेत भारताने सहज लोळवले. रोहितच्या नेतृत्वाखालील हे मालिकेतील सलग तिसरे निर्भेळ यश आहे.

India vs Sri Lanka, 3rd T20I Live Update : रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघाने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवण्याची मालिका कायम राखली आहे. न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांना ट्वेंटी-२० मालिकेत भारताने सहज लोळवले. रोहितच्या नेतृत्वाखालील हे मालिकेतील सलग तिसरे निर्भेळ यश आहे.

श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) हा आजही भारताच्या विजयाचा स्टार ठरला. त्याने सलग तिसरे अर्धशतक झळकावताना भारताचा ऐतिहासिक विजय पक्का केला. भारताचा हा सलग १२ वा ट्वेंटी-२० विजय आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १४६ धावा केल्या दासून शनाकाने ३८ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह नाबाद ७४ धावांची खेळी केली. अखेरच्या पाच षटकांत त्यांनी एकही विकेट न गमावता ६८ धावा केल्या.

पुन्हा एकदा दुष्मंथा चमिराने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला बाद केले. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ६ वेळा चमिराने रोहितची विकेट घेतली. संजू सॅमसन ( १८), दीपक हुडा ( २१) आज अपयशी ठरले. श्रेयसने २९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. या मालिकेतील हे त्याचे सलग तिसरे अर्धशतक ठरले. वेंकटेश अय्यरलाही ( ५) आज संधीचं सोनं करता आले नाही.

श्रेयस आणि रवींद्र जडेजा ही मागच्या सामन्यातील स्टार जोडी पुन्हा एकदा श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर उभी राहिली. या दोघांनी अगदी सहजतेनं भारताला विजय मिळवून दिला. श्रेयस व जडेजा यांनी भारताला ६ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. श्रेयस ४५ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह ७३ धावांवर, तर जडेजा २२ धावांवर नाबाद राहिले.

भारताने ही मालिका ३-० अशी जिंकून इतिहास रचला. ट्वेंटी-२०त सलग १२ सामने जिंकण्याच्या अफगाणिस्तान व रोमानिया यांच्या विश्वविक्रमाशी टीम इंडियाने आज बरोबरी केली. पण, एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध ट्वेंटी-२०त सर्वाधिक १७ विजय मिळवून भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान ( १६ वि. झिम्बाब्वे) यांचा विक्रम मोडला.

रोहितच्या नावावर नकोसा विक्रमही नोंदवला गेला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ४५ वेळा एकेरी धावसंख्येवर माघारी परणारा तो फलंदाज ठरला. त्याने आयर्लंडच्या केव्हिन ओब्रायनचा ( ४४) नकोसा विक्रम नावावर केला.

एका ट्वेंटी-२० मालिकेत सलग तीन ५०+ धावा करणारा तो विराट कोहलीनंतर दुसरा भारतीय ठरला. विराटने २०१२ मध्ये ( वि. श्रीलंका, न्यूझीलंड व अफगाणिस्ता), २०१४ मध्ये ( वि. दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, इंग्लंड) आणि २०१६ मध्ये ( वि. ऑस्ट्रेलिया) सलग तीन सामन्यांत ५०+ धावांचा पराक्रम केला होता.

श्रेयस अय्यरने या मालिकेत १७४.३५ च्या स्ट्राईक रेटने नाबाद २०४ धावा केल्या. श्रीलंकेला तीन सामन्यांच्या मालिकेत श्रेयसला एकदाही बाद करता आले नाही. त्याने या मालिकेत ५७*, ७४* व ७३* अशी खेळी केली. तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत २००+ धावा करणारा तो भारताचा पहिला फलंदाज ठरला. त्याने विराटचा ( वि. ऑस्ट्रेलिया, २०१६) १९९ धावांचा विक्रम मोडला.

द्विदेशीय तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत १००+ धावा करून नाबाद राहाणारा श्रेयस हा जगातील तिसरा फलंदाज ठरला. याआधी डेव्हिड वॉर्नरने २०१९मध्ये श्रीलंकेविरुद्ध २१७* आणि अफगाणिस्तानच्या नजिबुल्लाह झाद्रानने २०१६मध्ये यूएईविरुद्ध १०४* धावा केल्या होत्या.

धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक 54 विजयाचा विक्रम टीम इंडियाच्या नावावर नोंदवला गेला आहे. भारताने 74 सामन्यांत 54 विजय मिळवले आहेत. त्यांनी पाकिस्तानचा 53 विजयांचा ( 86 सामन्यांत) विक्रम मोडला.