Rishabh Pant, IND vs SL 1st Test : श्रीलंकेविरूद्ध भारताच्या संघाने पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर ६ बाद ३५७ धावा केल्या. ऋषभ पंतच्या ९६ धावा आणि हनुमा विहारीचं दमदार अर्धशतक (५८) याच्या जोरावर भारताने पहिल्या दिवशी साडेतीनशे पार मजल मारली.
भारतीय क्रिकेटरसिकांसाठी आजच्या दिवसाची सुरूवात खास होती. आपली १००वी कसोटी खेळणाऱ्या विराट कोहलीचा सन्मान चाहत्यांना पाहता आला. पण दिवसाच्या शेवटी पंतच्या न होऊ शकलेल्या शतकामुळे चाहते काहीसे हिरमुसले.
मोहाली कसोटीमध्ये पहिल्या दिवशी रिषभ पंतने ९७ चेंडूत ९६ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याच्या खेळीत ९ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. पंतच्या फटकेबाजीपुढे श्रीलंकन गोलंदाज हतबल झाल्याचं दिसून आलं. पण त्याचं शतक न झाल्याने अखेर चाहते नाराज झाले.
रिषभ पंत हा पाचव्यांदा नर्व्हस नाइंटीजचा शिकार झाला. त्यामुळे त्याला सर्वाधिक वेळा ९० ते १०० या धावसंख्येच्या मध्ये बाद होणाऱ्यां विकेटकिपरच्या यादीत स्थान मिळालं. त्यातही महत्त्वाची बाब म्हणजे त्याने धोनीच्या नकोशा विक्रमाशी बरोबरी केली.
धोनी आणि रिषभ पंत यांच्यातील फरक केवळ इतकाच की धोनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत ५ वेळा नर्व्हस नाइंटीजचा शिकार झाला, पण ऋषभ पंतला मात्र अवघ्या २९ सामन्यांतच त्या दु:खाला सामोरं जावं लागलं.
धोनीला कसोटी क्रिकेटमधील कारकिर्दीत एकूण पाच वेळा शतकाने हुलकावणी दिली होती. तीच नकोशी कामगिरी आज ऋषभ पंतच्या नावे झाली. आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकने एकूण ४ वेळा ही नकोशी कामगिरी केली आहे.
ऋषभ पंत हा दुसरा फलंदाज आहे, ज्याचे वयाच्या २५ वर्षापूर्वी ५ वेळा कसोटी शतक हुकले आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सचेही पंतसारखेच दुर्दैव होते. त्यालाही वयाच्या २५ वर्षापूर्वी पाच वेळा कसोटी शतकाने हुलकावणी दिली होती.
पाच पैकी चार वेळा ऋषभ पंत घरच्या मैदानावर नर्व्हस नाइंटीजचा शिकार झाला आहे. २०१८ साली विंडीज विरूद्ध तो दोन वेळा ९२ धावांवर बाद झाला. त्यानंतर गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात तो ९७ धावांवर बाद झाला. २०२१मध्ये चेन्नई कसोटीत इंग्लंडविरूद्धही तो ९१ धावांवर बाद झाला होता.
त्यानंतर आज पुन्हा तो ९६ धावांवर बाद झाला. पण पंतने ज्या लयीत आज फलंदाजी केली त्यावरून तो तुफान फॉर्मात आहे हे स्पष्टच आहे. त्यामुळे या मालिकेत तो शतक करेल अशी चाहत्यांना आशा आहे.