कुलदीप यादवचा वर्ल्ड रेकॉर्ड! बर्थ डे बॉयने केली कमाल, असा विक्रम कधीच झाला नव्हता

IND vs SA 3rd ODI : भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात दणदणीत विजय मिळवताना दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. सूर्यकुमार यादवच्या १०० आणि यशस्वी जैस्वालच्या ६० धावांच्या जोरावर भारताने २०१ धावा उभ्या केल्या. त्यानंतर कुलदीप यादवने पाच विकेट्स घेत आफ्रिकेचा संपूर्ण संघ ९५ धावांत तंबूत पाठवला. भारताने १०६ धावांनी मॅच जिंकली. कुलदीपने त्या सामन्यात मोठा विक्रम नोंदवला.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील दक्षिण आफ्रिकेचा हा धावांच्या बाबतीत तिसरा सर्वात मोठा पराभव ठरला. २०२३मध्ये डर्बन येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांना १११ धावांनी, तर २०२३मध्ये जोहान्सबर्ग येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०७ धावांची त्यांना पराभव पत्करावा लागला होता. भारताने काल १०६ धावांनी विजय मिळवला आणि २०२० चा ऑस्ट्रेलियाचा ( ९७ धावा) विक्रम मोडला.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त भारताकडून डावात ५ विकेट्स घेणारा कुलदीप यादव चौथा गोलंदाज ठरला. दीपर चहरने २०१९मध्ये नागपूर येथे बांगलादेशविरुद्ध ७ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या. २०१७मध्ये युझवेंद्र चहलने इंग्लंडविरुद्ध २५ धावांत ६ विकेट्स घेतलेल्या. भुवनेश्वर कुमारने ( ५-४ वि. अफगाणिस्तान, २०२२ व ५-२४ वि. दक्षिण आफ्रिका, २०१८) आणि कुलदीपने ( ५-१७ वि. दक्षिण आफ्रिका, २०२३ व ५-२४ वि. इंग्लंड, २०१८) दोन वेळा हा पराक्रम केलाय.

दक्षिण आफ्रिकेची ही ट्वेंटी-२०तील दुसरी निचांक कामगिरी आहे. २०२०मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८९ धावांवर त्यांचा संपूर्ण संघ गडगडला होता. या व्यतिरिक्त ९६ ( वि. ऑस्ट्रेलिया, २०२०), ९८ ( वि. श्रीलंका, २०१८) आणि १०० ( वि. पाकिस्तान, २०१३) या त्यांच्या निचांक धावा आहेत.

भारतीय संघाचा ट्वेंटी-२०तील हा तिसरा मोठा ( धावांच्या बाबतीत) विजय ठरला. २०२३ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्यांनी १६८ धावांनी, तर २०२३मध्ये आयर्लंडविरुद्ध १४३ धावांनी विजय मिळवला होता.

भारताच्या तीन गोलंदाजांनी यापूर्वी वाढदिवसाला ट्वेंटी-२० सामना खेळला. युवराज सिंगने २००९मध्ये श्रीलंकेविरुद्ध मोहातील २३ धावांत ३ विकेट्स आणि रवींद्र जडेजाने २०२० मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध हैदराबाद येथे ३० धावांत १ विकेट घेतली होती. हे तिघेही डावखुरे फिरकीपटू आहेत आणि तिघांचा वाढदिवस डिसेंबरमध्ये येतो.

वाढदिवसाला ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये डावात पाच विकेट्स घेणारा कुलदीप यादव ( ५-१७) हा जगातला पहिला गोलंदाज ठरला. यापूर्वी श्रीलंकेच्या वनिंदू हसरंगाने ( ४-९ वि. भारत, २०२१) वाढदिवसाला सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीची नोंद केली होती. इम्रान ताहीर ( ४-२१ वि. नेदरलँड्स, २०१४) आणि कार्तिक मैयप्पन ( ४-२५ वि. आयर्लंड, २०२१) यांनी वाढदिवसाला डावात ४ विकेट्स घेतल्या होत्या.