IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : रिषभ पंत फॉर्मात परतला, आफ्रिकेच्या गोलंदाजांना सॉलिड कुटला; सय्यद किरमानी यांचा विक्रम मोडला

India vs South Africa, 3rd day 3 Test Live Updates : कसोटी मालिकेतील निर्णयाक सामना अन् रिषभ पंतची फटकेबाजी.. हे जणू समीकरणच बनत चालले आहे.

India vs South Africa, 3rd day 3 Test Live Updates : कसोटी मालिकेतील निर्णयाक सामना अन् रिषभ पंतची फटकेबाजी.. हे जणू समीकरणच बनत चालले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत रिषभचीही ( Rishabh Pant) बॅट आतापर्यंत थंड पडली होती, परंतु निर्णयाक सामन्यात आघाडीच्या चार फलंदाजांनी शरणागती पत्करली अन् रिषभचा फॉर्म परतला.

रिषभच्या फटक्यांवरून टीका करणारेही आज त्याचे कौतुक करताना दिसले. ४ बाद ५८ वरून रिषभ व कर्णधार विराट कोहली यांनी टीम इंडियाचा डाव तिसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत ४ बाद १३० असा सावरला. भारतानं १४० धावांची आघाडी घेतली आहे. रिषभनं ६० चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ५१ धावांची खेळी करताना सय्यद किरमानी यांचा विक्रम मोडला.

भारताच्या पहिल्या डावातील २२३ धावांच्या प्रत्युत्तरात आफ्रिकेचा पहिला डाव २१० धावांवर गडगडला. भारताला आता दुसऱ्या डावात चांगली कामगिरी करून दाखवण्याची संधी होती. पण, लोकेश राहुल ( १०) व मयांक अग्रवाल ( ७) हे सलामीवीर याही डावात अपयशी ठरले. तिसऱ्या दिवसात पहिल्या ११ चेंडूंत चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे हे अनुभवी फलंदाज माघारी परतले आणि टीम इंडियाला मोठा धक्का बसला.

दिवसाच्या पहिल्याच षटकात मार्को येनसन यानं दुसऱ्याच चेंडूवर पुजाराला बाद केले, किगन पीटरसननं अफलातून झेल टिपला. त्यानंतर आलेल्या रहाणेला कागिसो रबाडानं भन्नाट चेंडू टाकून माघारी जाण्यास भाग पाडले. रहाणे बॅट मागे घेणार त्याआधीच चेंडू ग्लोव्ह्जला घासून यष्टिरक्षकाच्या दिशेनं गेला, परंतु त्याच्या हातून झेल सुटला होता. मात्र, स्लिपमध्ये उभ्या असलेल्या डीन एल्गनरनं संधी दवडली नाही.

यानंतर विराट बचावात्मक मोडमध्येच दिसला, परंतु रिषभ आज काहीतरी ठरवूनच आला होता. तो सुसाट खेळला.. कागिसो रबाडा, मार्को येनसन, लुंगी एनगिडी व ऑलिव्हर या जलदगती गोलंदाजांची त्यानं धुलाई सुरू केली. विराट त्याचे मनोबल उंचावत होता.

रिषभनं अर्धशतकी खेळी करताना मोठे विक्रम नोंदवले. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका येथे कसोटीत ५०+ धावा करणारा तो भारताचा तिसरा यष्टिरक्षक-फलंदाज ठरला. किरण मोरे आणि महेंद्रसिंग धोनी यांनाच हा विक्रम करता आला आहे.

परदेशातील कसोटीतील ही त्याची सहावी ५०+ खेळी ठरली आणि भारताकडून सर्वाधिक ५०+ धाव करणाऱ्या यष्टिरक्षक- फलंदाजांत त्यानं सय्यद किरमानी ( ५) यांचा विक्रम मोडला. धोनी ( १९), फारूख इंजिनियर ( ८) व किरण मोरे ( ८) हे आता आघाडीवर आहेत.