मोहम्मद सिराजनं मैदान गाजवलं! कुंबळे, श्रीनाथ यांना मागे टाकलं; टीम इंडियाचेही पराक्रम

IND vs SA 2nd Test Live Updates Marathi : मोहम्मद सिराजने ( Mohammed Siraj ) दुसऱ्या कसोटीत ९-३-१५-६ अशी भन्नाट गोलंदाजी करून दक्षिण आफ्रिकेला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. जसप्रीत बुमराह व मुकेश कुमार यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेऊन आफ्रिकेचा पहिला डाव १२१ मिनिटांत ५५ धावांत गुंडाळला. भारताविरुद्ध कोणत्याही संघाची कसोटीतील ही सर्वात निचांक कामगिरी ठरली.

घरच्या मैदानावर आफ्रिका तिसऱ्यांदा आघाडीचे ४ फलंदाज १५ धावांत माघारी परतले. १९०२ नंतर ( ४-१२ वि. ऑस्ट्रेलिया, केप टाऊन ) प्रथमच आफ्रिकेची अशी वाईट अवस्था झाली आहे. त्याआधी १८८९मध्ये इंग्लंडविरुद्ध केप टाऊन येथेच १२ धावांत ४ फलंदाज माघारी परतले होते.

१९३२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटीत आफ्रिकेचे आघाडीचे ४ फलंदाज ५ किंवा त्यापेक्षा कमी धावा करून माघारी परतले होते. आज ९२ वर्षानंतर त्यांची ही अवस्था झाली. दक्षिण आफ्रिकेची घरच्या मैदानावरील पहिल्या डावातील ही तिसरी निचांक कामगिरी ठरली. १९९९ मध्ये इंग्लंडविरुद्ध त्यांचे ४ फलंदाज २ धावांत, २००१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध ४ फलंदाज १३ धावांत माघारी परतले होते. त्याआधी १८८९मध्ये इंग्लंडविरद्ध १६ धावांत ४ विकेट्स पडल्या होत्या.

१९२७ मध्ये घरच्या मैदानावर शेवटचं आफ्रिकेचे ६ फलंदाज ३५ किंवा त्यापेक्षा कमी धावांवर ( ६-२६ वि. इंग्लंड, जोहान्सबर्ग) माघारी परतले होते. एकंदर १९३२ नंतर दोनवेळाच आफ्रिकेवर ही नामुष्की ओढावली होती. २०१५ नंतर आज आफ्रिकेचे ६ फलंदाज ३५ किंवा त्यापेक्षा कमी धावांवर तंबूत परतले आणि दोन्ही वेळा भारताविरुद्ध त्यांनी नांग्या टाकल्या.

मोहम्मद सिराजने आज १५ धावांत ६ विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिकेतील कसोटी क्रिकेटमधील भारतीय गोलंदाजाची ही तिसरी सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. २०२२ मध्ये शार्दूल ठाकूरने जोहान्सबर्गमध्ये ६१ धावांत ७ विकेट्स घेतल्या होत्या. २०२१ मध्ये हरभजन सिंगने केप टाऊन येथे १२० धावांत ७ बळी टिपलेले. त्यानंतर सिराजच्या आजच्या कामगिरीची नोंद होते आणि त्याने अनिल कुंबळे ( ६-५३, जोहान्सबर्ग, १९९२) आणि जावगल श्रीनाथ ( ६-७६, गॅबेर्हा, २००१) यांचा विक्रम मोडला.

दक्षिण आफ्रिकेची ही घरच्या मैदानावरील कसोटीतील पाचवी निचांक खेळी ठरली. १८९६मध्ये इंग्लंडविरुद्ध ३० धावांत आफ्रिकेचा संघ तंबूत परतला होता. त्यापाठोपाठ ३५ ( वि. इंग्लंड, १८९९), ४३ ( वि. इंग्लंड, १८८९) आणि ४७ ( वि. इंग्लंड, १८८९) असा क्रम येतो. १९५६मध्ये इंग्लंडविरुद्ध जोहान्सबर्ग कसोटीत आफ्रिकेचा संपूर्ण संघ ७२ धावांवर गडगडला होता.

दक्षिण आफ्रिका आज ५५ धावांवर ऑल आऊट झाली आणि ही भारताविरुद्धची प्रतिस्पर्धी संघाची निचांक कामगिरी ठरली. यापूर्वी २०२१ मध्ये मुंबईत न्यूझीलंड ६२ धावांवर ऑल आऊट झाली होती.

भारतीय जलदगती गोलंदाजाने सर्वात कमी धावांत ५ विकेट्स घेण्याची ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. जसप्रीत बुमराहने २०१९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ७ धावांत ५ विकेट्स घेतल्या होत्या. सिराजने आज १५ धावांत ६ विकेट्स घेताना जवागल श्रीनाथचा १९९६ सालचा ( ६-२१ वि. दक्षिण आफ्रिका, अहमदाबाद) विक्रम मोडला.