'रनमशिन' विराटच्या निशाण्यावर सहा मोठ्ठे विक्रम! सचिनसह सेहवाग, पॉन्टींगलाही टाकणार मागे

Virat Kohli Records, Champions Trophy 2025 IND vs NZ : न्यूझीलंड विरूद्धच्या आजच्या सामन्यात विराट कोहलीला अनेक विक्रम करण्याची सुवर्णसंधी आहे

भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली आजच्या न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात ६ मोठे विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे. जाणून घेऊया त्याबद्दल...

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विराट कोहलीने आत्तापर्यंत १५ सामन्यात ६५१ धावा केल्या आहेत. आजच्या सामन्यात त्याने ५२ धावा केल्या तर चॅम्पियन्स ट्रॉफी इतिहासात सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज म्हणून तो नवा विक्रम रचेल. आतापर्यंत या यादीत शिखर धवन ७०१ धावांसह अव्वल आहे.

विराट कोहलीने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात १४२ धावांची धडाकेबाज खेळी केली तर तो ख्रिस गेलला मागे टाकेल. सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये ख्रिस गेल १७ सामन्यात ७९१ धावांसह अव्वल स्थानी आहे.

आजच्या सामन्यात कोहलीने १०६ धावा केल्यास तो वनडे क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरेल. सध्या कोहलीच्या ३१ सामन्यांमध्ये १६४५ धावा आहेत. या यादीत सचिन तेंडुलकर ४२ सामन्यात १७५० धावांसह अव्वल स्थानी आहे.

विराट कोहलीने आज शतक ठोकल्यास तो न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक शतक ठोकणारा वन-डे क्रिकेट मधील फलंदाज ठरेल. सध्या वीरेंद्र सेहवाग आणि रिकी पॉंटिंग यांच्यासह विराट कोहली सहा शतकांसह संयुक्तपणे अव्वल आहे.

आजच्या सामन्यात विराट कोहलीला ५०हून अधिक धावा सर्वाधिक वेळा करण्याचा विक्रम खुणावतोय. सध्या विराट, शिखर धवन, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांनी प्रत्येकी ६६ वेळा फिफ्टी प्लस स्कोअर केलाय. विराटने अर्धशतक ठोकले तर तो एकटा अव्वलस्थानी विराजमान होईल.

आजच्या सामन्यात विराट कोहलीने अर्धशतक ठोकल्यास आयसीसी स्पर्धांमध्ये फिफ्टी प्लस धावसंख्येच्या बाबतीत तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकेल. सध्या दोघांनी २३ वेळा फिफ्टी प्लस धावसंख्या केलेली आहे.