Breaking : टीम इंडियाचा दुखापतीचा 'सराव'! सूर्यकुमार, विराट जखमी; इशान किशनला चावली मधमाशी

ICC ODI World Cup 2023 IND vs NZ : भारत-न्यूझीलंड यांच्यात वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना उद्या धर्मशाला येथे होणार आहे. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत अपराजित असलेले दोन्ही संघ समोरासमोर येणार असल्याने कोण कोणावर भारी पडतो याची सर्वांना उत्सुकता आहे.

हार्दिक पांड्याच्या जखमी होण्याने भारतीय संघाचे टेंशन आधीच वाढले आहे. त्यात किवींनाही कर्णधार केन विलियम्सनशिवाय खेळावे लागणार आहे. पण, त्यांचा अनुभवी गोलंदाज टीम साऊदी उद्या खेळणार आहे. भारताची मात्र डोकेदुखी आणखी वाढली आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघाने नेट्समध्ये आज घाम गाळला. आऱ अश्विन, शार्दूल ठाकूर, विराट कोहली, इशान किशन, सूर्यकुमार यादव यांनी फलंदाजीचा सराव केला. पण, विराट व सूर्यकुमार यांना दुखापत झाली आणि त्यांनी सराव अर्ध्यावर सोडला.

इशान किशनला फलंदाजीचा सराव करताना मधमाशी चावली आणि त्याला प्रचंड वेदना झालेल्या दिसल्या. त्यामुळे फिजिओ त्याच्याकडे त्वरित धावत आले. थोड्यावेळानंतर इशानने नेट्समधून बाहेर जाणे योग्य समजले.

हार्दिच्या गैरहजेरीत इशान किंवा सूर्यकुमार यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात असताना सूर्यकुमारलाही उजव्या मनगटावर चेंडू आदळल्याने दुखापत झाली. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड त्याच्याजवळ पळत आले. त्याने मनगटावर पट्टी बांधली. आईस पॅकने त्याने शेक घेतला आणि फिजिओ त्याच्या मनगटावर उपचार करताना दिसले.

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली यालाही फलंदाजी करताना दुखापत झाली, थ्रो डाऊन स्पेशालिस्टने टाकलेला चेंडू विराटच्या उजव्या मांडीवर जोरात आधळला आणि वेदनेने तो त्रस्त दिसला. त्यानेही थोडी विश्रांती घेत पुन्हा सराव सत्रात सहभाग घेतला.