IND vs NZ, 1st Test Live Updates : श्रेयस अय्यरनं रचला इतिहास; पदार्पणाच्या कसोटीत 'हा' पराक्रम करणारा पहिला भारतीय फलंदाज

India vs New Zealand, 1st Test Live Updates : पहिल्या डावात ४९ धावांची आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघाला पहिल्या कसोटीत मोठी आघाडी घेण्याची संधी होती. पण, भारताचा निम्मा संघ ५१ धावांवर माघारी पाठवून न्यूझीलंडनं यजमानांना दणका दिला. पदार्पणवीर श्रेयस अय्यरनं ( Shreyas Iyer) पुन्हा टीम इंडियाचा डाव सावरला अन् मोठा पराक्रम केला.

India vs New Zealand, 1st Test Live Updates : पहिल्या डावात ४९ धावांची आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघाला पहिल्या कसोटीत मोठी आघाडी घेण्याची संधी होती. पण, भारताचा निम्मा संघ ५१ धावांवर माघारी पाठवून न्यूझीलंडनं यजमानांना दणका दिला. अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांचा अपयशाचा पाढा याही सामन्यात कायम राहिला. पण, पदार्पणवीर श्रेयस अय्यरनं ( Shreyas Iyer) पुन्हा टीम इंडियाचा डाव सावरला अन् मोठा पराक्रम केला.

रवींद्र जडेजा (५०), शुबमन गिल ( ५२) आणि श्रेयस अय्यर ( १०५) यांच्या दमदार खेळीनंतरही भारताला ३४५ धावांवर समाधान मानावे लागले. टीम साऊदीनं ६९ धावा देताना ५ बळी टिपले. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचे सलामीवीर टॉम लॅथम व विल यंग यांनी पहिल्या विकेटसाठी १५१ धावांची भागीदारी केली. पण, तिसऱ्या दिवशी अक्षर पटेलनं त्यांना बॅकफूटवर फेकले. यंग ८९ आणि लॅथम ९५ धावांवर बाद झाले. त्यांच्यानंतर कायले जेमिन्सन ( २३) हा किवींकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. अक्षर पटेलनं ६२ धावांत ५ विकेट्स घेतल्या. आर अश्विननं ८२ धावांत ३ बळी टिपले.

भारताच्या दुसऱ्या डावात शुबमन गिल ( १) दुसऱ्याच षटकात जेमिन्सनच्या गोलंदाजीवर बाद झाला. अडचणीत सापडलेल्या भारतीय संघाला अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा ही जोडी सांभाळेल असे वाटत होते, परंतु त्यांनी पुन्हा निराश केलं. कायले जेमिन्सननं चौथ्या दिवसाची पहिली विकेट घेतली ती पुजाराची. पुजारा २२ धावांवर बाद झाला. अजाझ पटेलनं कर्णधार अजिंक्यला ( ४) पायचीत केले. त्यानंतर टीम साऊदीनं सलामीवीर मयांक अग्रवालला ( १७) आणि रवींद्र जडेजाला ( ०) बाद करून टीम इंडियाचा निम्मा संघ ५१ धावांवर माघारी पाठवला.

आर अश्विन व श्रेयस अय्यर या जोडीनं खिंड लढवताना संघाच्या खात्यात ५२ धावांची भर घातली. जेमिन्सननं ही जोडी तोडताना अश्विनला ( ३२) बाद केलं. पण, श्रेयस आत्मविश्वासानं खेळला. त्यानं दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावून मोठा पराक्रम केला.

कसोटी पदार्पणात १५०+ धावा करणाता तो लाला अमरनाथ ( १९३३), शिखर धवन ( २०१३) व रोहित शर्मा ( २०१३) यांच्यानंतरचा चौथा भारतीय फलंदाज ठरला. तर कसोटी पदार्पणात दोन्ही डावांत ५०+ धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये त्यानं दिलवर हुसैन ( वि. इंग्लंड, १९३४) व सुनील गावस्कर ( वि. वेस्ट इंडिज, १९७१) यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.

पदार्पणाच्या सामन्यात शतक व अर्धशतक झळकावणारा श्रेयस हा पहिला भारतीय ठरला आहे. त्यानं पहिल्या डावात १०५ धावा केल्या होत्या.