बुमराहला विश्रांती नाही, कोहलीसोबतही झाली चर्चा;कोण IN, कोण OUT, लवकरच संघाची घोषणा

IND Vs ENG: भारतीय संघाला राजकोटमध्ये १५ फेब्रुवारीपासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळायचा आहे.

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. विराट कोहलीचे संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. तसेच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहलाही तिसऱ्या कसोटीत विश्रांती दिली जाणार नसल्याचं सांगण्यात येत आहे.

भारतीय संघाला राजकोटमध्ये १५ फेब्रुवारीपासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळायचा आहे. तर आतापर्यंतच्या दोन सामन्यांनंतर मालिका १-१ अशी बरोबरीत आहे.

अशा स्थितीत तिसऱ्या सामन्यापूर्वी बीसीसीआयला शेवटच्या तीन कसोटींसाठी भारतीय संघही जाहीर करावा लागणार आहे. विराट कोहलीने वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या दोन सामन्यांमधून विश्रांती घेतली होती.

विराट कोहली संघात पुनरागमन करू शकतो. दरम्यान, सूत्रांच्या हवाल्याने असे वृत्त मिळाले आहे की, भारतीय संघाची घोषणा आज किंवा उद्या (७ किंवा ८ फेब्रुवारी) होऊ शकते.

दुसरी कसोटी जिंकल्यानंतर कामाच्या ताणामुळे बुमराहला तिसऱ्या कसोटीतून विश्रांती दिली जाऊ शकते, अशी चर्चा होती. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीदरम्यान संघाला सुमारे १० दिवसांची विश्रांती मिळणार आहे. त्यामुळे बुमराहला या काळात पुरेशी विश्रांती मिळू शकते.

भारताला विजयाची मालिका सुरुच ठेवायची आहे. त्यामुळे बुमराहला विश्रांती न देण्याचा निर्णय बीसीसीआयकडून घेतला जाऊ शकतो. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये बुमराहने शानदार गोलंदाजी केली. अशा परिस्थितीत या चॅम्पियन खेळाडूला ठेवून व्यवस्थापनाला धोका पत्करायचा नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमधून विश्रांती घेणारा विराट कोहली आणि भारतीय संघ व्यवस्थापन यांच्यात चर्चा झाली आहे. मात्र असे असूनही विराट कोहली तिसऱ्या कसोटीत खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याच्या खेळण्याबाबत स्पष्टता नाही.

दुसरी कसोटी जिंकल्यानंतर प्रशिक्षक द्रविड यांनी कोहलीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना निवडकर्त्यांना याबाबत विचारणे योग्य ठरेल, असे सांगितले होते. काही दिवसांत निवडकर्ते संघाची घोषणा करतील.